होमपेज › Solapur › लग्‍नास नकार दिल्याने युवतीस पेटवले

लग्‍नास नकार दिल्याने युवतीस पेटवले

Published On: Dec 30 2017 12:35AM | Last Updated: Dec 29 2017 10:48PM

बुकमार्क करा
बीड : प्रतिनिधी

लग्‍नास नकार दिल्याच्या रागातून तरुणाने इतर तिघांच्या सहाय्याने अल्पवयीन युवतीच्या घरात घुसून रॉकेल ओतून तिला पेटवून दिल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील सोनवळा येथे घडली. या घटनेत ही युवती गंभीर भाजली असून तिच्यावर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रज्ञा ऊर्फ सोनाली सतीश मस्के (वय 17, रा. सोनवळा) असे या पीडित युवतीचे नाव आहे. ती सध्या लोखंडी सावरगाव येथील महाविद्यालयात 11 वीत शिकत आहे. तिने जबाबात सांगितल्यानुसार तिचे आई-वडील सध्या कुंद्री येथील साखर कारखान्यावर ऊसतोडणीसाठी गेले आहेत. त्यामुळे ती सध्या आजी आणि दोन भावांसह सोनवळा येथेच राहते. मागील आठवड्यात महादेव जालिंदर घाडगे या तरुणाने प्रज्ञाला लग्‍नासाठी मागणी घातली होती; परंतु, तिने त्यास नकार दिला होता. 26 डिसेंबर रोजी तिची आजी अंबाजोगाईला आली होती, तर एक भाऊ शाळेत आणि एक भाऊ चुलत्याकडे गेलेला असल्याने ती घरी एकटीच होती. सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी बबन नरहरी मस्के, कविता जालिंदर घाडगे, महादेव जालिंदर घाडगे आणि सुवर्णा बबन मस्के हे चौघेजण तिच्या घरी आले. यावेळी महादेव घाडगे याने प्रज्ञास माझ्याशी लग्‍न करणार आहेस का असे विचारले. यावर प्रज्ञाने माझे वडील आणि चुलते यासाठी नाहीच म्हणणार आहेत आणि मीदेखील तुझ्यासोबत लग्‍न करणार नाही असे सांगितले. त्यानंतर बबन मस्के व कविता घाडगे या दोघांनी घरामध्ये येऊन प्रज्ञाचे दोन्ही हात बांधले. महादेव घाडगे याने तिच्या अंगावर रॉकेल ओतले आणि सुवर्णा बबन मस्के हिने काडी ओढून प्रज्ञाला पेटवून दिले. यानंतर चौघेही संशयित आरोपी तिथून पळून गेले. जीवाच्या आकांताने प्रज्ञाने आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक धावत आले आणि त्यांनी प्रज्ञाला अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केले, असे प्रज्ञाने जबाबात सांगितले आहे. या घटनेत प्रज्ञा 61 टक्के भाजली असून तिची प्रकृती गंभीर आहे. गुरुवारी  पोलिस उपअधीक्षक यांच्यासमोर फौजदार देवकन्या मैंदाड यांनी तिचा इन कॅमेरा जबाब नोंदविला. याप्रकरणी प्रज्ञाच्या जबाबावरून संशयित आरोपी बबन नरहरी मस्के, कविता जालिंदर घाडगे, महादेव जालिंदर घाडगे आणि सुवर्णा बबन मस्के या चौघांवर धारूर  गुन्हा नोंदविण्यात आला असून सर्व आरोपी पसार झाले आहेत. फौजदार घोळे हे पुढील तपास करत आहेत.