Sun, Jul 21, 2019 08:29होमपेज › Solapur › वक्तव्य भोवले; राम कदमांवर बार्शीत गुन्हा

वक्तव्य भोवले; राम कदमांवर बार्शीत गुन्हा

Published On: Sep 08 2018 1:34AM | Last Updated: Sep 08 2018 1:34AMबार्शी : तालुका प्रतिनिधी 

मुंबई येथील दहीहंडी कार्यक्रमात बोलताना भारतीय जनता पक्षाचे आ. राम कदम यांनी महिलांच्या संदर्भात अपमानास्पद व शांतता भंग होईल, असे वक्तव्य केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मंदा शिवाजीराव काळे (रा. उपळाई रोड, श्रीकृष्ण कॉलनी, बार्शी) यांनी याबाबत बार्शी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आवडलेली पोरगी पळवून आणून देतो, असे वक्तव्य आ. कदम यांनी जाहीर कार्यक्रमात केले होते. त्यावरून राज्यभरात सद्या निषेध नोंदविला जात आहे. 

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंदा काळे यांनी याबाबत पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 3 सप्टेंबर 2018 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घाटकोपर येथे दहीहंडीचा कार्यक्रम होता. त्यावेळी कार्यक्रमाला भाजप प्रवक्ते आमदार राम कदम हे हजर होते.

 या कार्यक्रमाप्रसंगी भाषण करत असताना महिलांचा अपमान व्हावा या उद्देशाने कदम यांनी प्रक्षोभक भाषण करुन महिलांची शांतता भंग होईल, असे वक्तव्य केले होते. मला फक्त एक फोन करा.., चुकीच असेल तरीही 100 टक्के मदत करणार, आपण मुलीला पळवून आणून देऊ, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर शहरातील महिलांनी फिर्यादी यांची भेट घेऊन महिलांसंदर्भात करण्यात आलेल्या अपमानास्पद वक्तव्याबाबत संताप व्यक्त केला होता. आ. कदम यांनी आक्षेपार्ह विधाने करुन आपला अपमान केला असल्यामुळे त्याबाबत आपण रितसर पोलिस ठाण्यास तक्रार देण्याबाबत ठरले होते. त्यानुसार काळे यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.आ. कदम यांच्यावर प्रक्षोभक व महिलांची मानहानी होईल, असे वक्तव्य करून महिलांची बदनामी केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात 504, 505/2 अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी पोलिस ठाण्यात राष्ट्रवादी लिगल सेलचे जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. विकास जाधव, जिल्हा अध्यक्षा मंदा काळे, अ‍ॅड. राजश्री डमरे, मंगल शेळवणे, करूणा हिंगमिरे, रिजवाना शेख आदी उपस्थित होते.