Wed, Jul 24, 2019 14:27होमपेज › Solapur › पैसे वसुलीसाठी अपहरण, मारहाण

पैसे वसुलीसाठी अपहरण, मारहाण

Published On: Jul 06 2018 1:35AM | Last Updated: Jul 06 2018 1:26AMसोलापूर : प्रतिनिधी

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमचा पराभव झाला, त्यात आमचे आर्थिक नुकसान झाले म्हणून अपहरण करून आठ दिवसांत दहा लाख आणून दे, अन्यथा जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नगरसेविका मेनका राठोड यांच्यासह पाच जणांविरोधात विजापूर नाका पोलिस ठाण्यात अपहरण, मारहाण आदी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

याबाबत अशोक कनोराम चव्हाण (वय 42, रा. राजस्व नगर, विजापूर रोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. सविस्तर असे की, बुधवारी रात्रीच्या सुमारास रवी राठोड, दीपक राठोड, संजय पवार या तिघांनी फिर्यादीच्या घरी येऊन तुला नगरसेविका मेनका राठोडसह इतरांनी बोलावल्याचे सांगून बळजबरीने मोटारसायकलवर बसवले. भाग्यश्री मिनी मार्केटच्या दुकानाजवळ आणून तेथून पुढे स्कॉर्पिओ गाडीमध्ये घालून शिवराज राठोड याच्या घरी घेऊन गेले. तेथे फिर्यादी अशोक चव्हाण यांना फरशीवर बसवले. नगरसेविका मेनका राठोड यांनी दरवाजाची आतील कडीकोयंडा बंद करुन घेतले. शिवराज आणि नगरसेविकेने लाकडी स्टम्पने व दांडक्याने मारहाण करण्यास सुरूवात केली. इतरांनी चव्हाण यांना पकडून ठेवले. बाजार समितीच्या निवडणुकीत दिलीप माने यांच्या बहिणीच्या बाजूने प्रचार केल्याने माझ्या पत्नीचा पराभव झाला, त्यात आमचे वीस लाख रुपये खर्च झाले. तुझ्यामुळे आमचे नुकसान झाले. तू आठ दिवसांत आम्हाला दहा लाख रुपये आणून दे अन्यथा तुझ्या परिवारास खल्लास करुन टाकू, अशी धमकी शिवराज राठोड यांनी दिली. या मारहाणीत सोन्याची चेन खाली पडली होती, ती रवी राठोडने खिशात घातल्याचेदेखील तक्रारअर्जात नमूद आहे. चव्हाण यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी नगरसेविका मेनका राठोड, शिवराज रेवणसिद्ध राठोड, रवी तुकाराम राठोड, दीपक राठोड, संजय धर्मा पवार (सर्व रा. मंत्री चंडक रेसीडेन्सी, पापाराम नगर, विजापूर रोड) यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलिस करत आहेत.