होमपेज › Solapur › जादा व्याजदराच्या लालसेपोटी  संस्था बुडतात : दामोदर देशमुख

जादा व्याजदराच्या लालसेपोटी  संस्था बुडतात : दामोदर देशमुख

Published On: Dec 30 2017 12:35AM | Last Updated: Dec 29 2017 10:13PM

बुकमार्क करा
मंगळवेढा : तालुका प्रतिनिधी 

महाराष्ट्रातील  28 हजार पतसंस्थापैकी 13 हजार पतसंस्था व 725 सहकारी बंँकापैकी जवळपास 160 बँंका बुडालेल्या आहेत.त्यामध्ये ठेवीवरील ज्यादा व्याज दराचे आमिष  हे एक प्रमुख कारण आहे,असे परखड मत सहकार भारतीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष  दामोदर देशमुख  व्यक्त केले.

महाराष्ट्रातील  सहकारी पतसंस्था व सहकारी बँकांच्या आर्थिक सर्वेक्षणानुसार मार्च सन 2020 पर्यंत सध्या आस्तित्वात असणार्‍या पैकी 28 ते30  टक्के सहकारी पतसंस्था व सहकारी बँका अवसायानात निघतील म्हणजे बंद पडतील असा स्पष्ट  इशारा दिला आहे.

यावेळी पुढे बोलताना देशमुख म्हणाले की,  भाईचंद हिराचंद रायसोनी,(बी. एच.आर) पतसंस्था जळगाव यांनी 1400 कोटी रुपये, तापी नागरी पतसंस्था  700 कोटी रुपये, सहकारमित्र चंद्रकांत बढे सर पतसंस्था 600 कोटी रुपये तर भुदरगढ पतसंस्था कोल्हापूर यांनी  450 कोटी रुपये जनतेच्या पैशाला बुडविलेले आहे. या सर्वांचे  ठेवीवरील व्याजाचे दर इतरापेक्षा 1 ते 2  टक्के जास्ते ठेवलेेले होते.

जनतेचे आर्थिक क्षेत्राबद्दलचे असलेले अज्ञान व ज्यादा व्याज मिळावे म्हणून असणारा आपला हव्यास हा आपले पैसे बुडण्यास कारणीभूत असतो. सहकारी पतसंस्था 500 कोटी ठेवीकडे वाटचाल  किंवा 15 टक्के लाभांश  अशा  आकर्षक  जाहिरातीचा मारा सतत ठेवीदारावर करतात. 

परंतु , आमची  10 टक्के थकबाकी,15 टक्के थकबाकी किंवा 20 टक्के थकबाकी आहे असे या पतसंस्था जाहीर करीत नाहीत. अनेक सहकारी पतसंस्था व सहकारी बँकांनी अशा  या थकबाकीचा साधा उल्लेखही वार्षिक  अहवालामध्ये गेल्या 10-20 वर्षांमध्ये  एकदाही केलेला दिसत नाही.थकबाकी कळू न देण्यामागचा हेतू ठेवीदारांनी जाणून घेतला पाहिजे असाही सल्ला  दामोदर देशमुख यांनी दिला आहे. त्यामुळे ठेवीदारांनीही अधिक व्याजाच्या मोहाला बळी पडून पारदर्शकतेचा अभाव असलेल्या संस्थांमध्ये ठेवी ठेऊ नयेत असेही आवाहन देशमुख यांनी केले आहे.