Wed, Aug 21, 2019 14:46होमपेज › Solapur › जिल्ह्यातील 109 सोसायट्यांची  अटल महापणन अभियानात निवड  

जिल्ह्यातील 109 सोसायट्यांची  अटल महापणन अभियानात निवड  

Published On: Dec 30 2017 12:35AM | Last Updated: Dec 29 2017 10:39PM

बुकमार्क करा
सोलापूर : महेश पांढरे

राज्यातील विकास कार्यकारी सोसायट्यांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी अटल महापणन अभियान राबविण्यात येणार असून यासाठी राज्यातील 5 हजार सोसायट्यांची निवड करण्यात आली असून यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 109 विकास सोसायट्यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी दिली आहे.

राज्यातील सहकारी पणन व्यवस्थेंतर्गत असलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, खरेदी-विक्री संघ व महाराष्ट्र राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशनच्या सक्षमीकरणासाठी अटल महापणन विकास अभियान सुरु करण्यात आले आहे. यामध्ये लोकसहभागाबरोबरच कॉर्पोरेट कंपन्यांचा सहभाग घेण्यात येत आहे. 

या अभियानामध्ये आतापर्यंत 509 सहकारी पणन संस्थांनी स्वबळावर नवीन व्यवसाय सुरु केले आहेत. विकास संस्थांनी कर्जवाटप व वसुलीच्या पलीकडे जाऊन बिगर वित्तीय व्यवसाय सुरु करावेत, अशा सूचना  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. त्यानुसार राज्यातील 5 हजार विकास सोसायट्यांची निवड पहिल्या टप्प्यात करण्यात आली आहे. या संस्थांना विविध व्यवसाय आणि उद्योगांसाठी मार्गदर्शन करुन त्यांच्यामार्फत वेगवेगळे व्यवसाय सुरु करण्यात येणार आहेत. यासाठी मार्केटिंग, विक्री, एक्सपोर्ट अशा बाबींवर लक्ष केंद्रीत करुन त्याचा ब्रँड तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हास्तर, विभागस्तरावर अंमलबजावणी व सनियंत्रण समिती गठीत करण्यात आली असून जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी अध्यक्ष, तर  मुख्य   कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र  विकास महामंडळाचे प्रतिनिधी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रतिनिधी, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, विदर्भ सहकारी मार्केटिंग फेडरेशन, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, महिला आर्थिक विकास महामंडळाचे समन्वयक हे सदस्य असणार आहेत, तर जिल्हा उपनिबंधक हे या समितीचे सदस्य सचिव असणार आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील दहा-दहा विकास सोसायट्यांची निवड  करण्यात आली आहे. सोलापूर शहरातील 15 संस्थांची या अभियानासाठी निवड करण्यात आली आहे. कर्ज वाटप आणि वसुली यापलीकडे जाऊन विकास सोसायट्यांनी स्वत:चे उद्योग व व्यवसाय सुरु करावेत आणि त्यातून रोजगारनिर्मिती करावी हा या अभियानाचा उद्देश आहे.

या अभियानामुळे विकास सोसायट्यांची भरभराट होणार आहे, अशी माहितीही जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी यावेळी दिली.