Tue, Apr 23, 2019 21:54होमपेज › Solapur › सूत दरात १० रुपयांपर्यंत वाढ; यंत्रमागधारक हवालदिल 

सूत दरात १० रुपयांपर्यंत वाढ; यंत्रमागधारक हवालदिल 

Published On: Dec 11 2017 1:35AM | Last Updated: Dec 10 2017 9:32PM

बुकमार्क करा

सोलापूर : वेणुगोपाळ गाडी

सोलापूरच्या यंत्रमाग उद्योगावरील संकटात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. या उद्योगातील प्रमुख कच्चा माल समजल्या जाणार्‍या सूत दरात प्रतनिहाय 5 ते 10 रुपयांची वाढ झाल्याने नुकसानीत धंदा करण्याची वेळ यंत्रमागधारकांवर आली आहे. यासहन अनेक अडचणींमुळे यंत्रमाग चक्क भंगारात विक्रीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. 

उद्योगातील मंदी, नोटाबंदी, जी.एस.टी. आदींचा फटका यंत्रमाग उद्योगाला बसल्याची यंत्रमागधारकांची ओरड आहे. अशातच गेल्या काही महिन्यांपासून पी.एफ.चा तगादा लागल्यामुळे हवालदिल झालेल्या यंत्रमागधारकांनी वेगळा पर्याय निवडण्यास सुरुवात केली आहे. पारंपरिक पद्धतीने चालणारा हा उद्योग चालविणे कठीण बनल्याने काही महिन्यांपासून यंत्रमाग भंगारात विकण्यास सुरूवात झाली.समस्यांच्या विळख्यात सापडलेल्या यंत्रमाग उद्योगाला गेल्या काही दिवसांपासून सूत दरवाढीलाही सामोरे जावे लागत आहे. सूत दरात प्रतनिहाय 5 ते 10 रुपयांची वाढ झाली आहे. मात्र या वाढीच्या तुलनेत पक्क्या मालाला दर मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे पक्का माल चक्क नुकसानीत विकण्याची नामुष्की यंत्रमागधारकांवर आली आहे.

अंतर्गत स्पर्धेचा फटका

सूत दरवाढीविषयी जिल्हा यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांच्याशी दै. ‘पुढारी’ने संवाद साधला असता ते म्हणाले, कुठल्याही उद्योगाच्या कच्च्या मालाच्या दरात दोन-पाच टक्क्यांची दरवाढ ही नैसर्गिक असते. तेजीचा फायदा घेऊन कच्च्या मालाच्या दरात कृत्रिम वाढ केली जातो, हा सर्वसाधारण अनुभव आहे. सोलापूरच्या यंत्रमाग उद्योगाचा विचार करता उत्पादन व विक्री मूल्यात फार अंतर नाही, असे दिसून येते. याला स्पर्धा कारणीभूत आहे. वाजवी नफा घेऊनच यंत्रमागधारकांनी आपली उत्पादने विकणे अपेक्षित आहे.  एकंदर यंत्रमागला ‘बुरे दिन’ आले आहेत. अनेक अडचणींतून मार्गक्रमण करणार्‍या या उद्योगाला कोणी वाली नाही, अशी स्थिती आहे. वाढत्या समस्यांचा विचार करता या उद्योगासमोरील पेच कायम आहे. भंगारात होत असलेली विक्री पाहता नजिकच्या काळात या उद्योगाच्या दुरवस्थेत वाढ होणार, हे मात्र निश्‍चित.