गेवराई : प्रतिनिधी
गेवराई जवळील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या एका कापूस जिनिंगला आग लागल्याची घटना मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या आगीत 3 हजार दोनशे कापूस गाठी जळून खाक झाल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. जिनिंगला लागलेली आग एवढी भीषण होती की सायंकाळी उशिरापर्यंत आग विझवण्याचे काम सहा अग्निशामक दलाच्या गाड्यांमार्फत सुरु होते. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण मात्र समजू शकले नाही.
गेवराई जवळील राष्ट्रीय महामार्गावरील बागपिंपळगाव लगत मनजित जिनिंगला मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कापसाच्या गाठी ठेवलेल्या गोडाऊनमधून धूर निघू लागल्याचे येथे काम करणार्या मजुरांच्या लक्षात आले. यानंतर काही वेळातच कापसाच्या गाठीला भीषण आग लागून आगीने उग्र रूप धारण केले. याची माहिती अग्निशामक दलाला देताच आग विझविण्यासाठी गेवराई येथील नगर परिषद व कृषी उत्पन्न बाजार समिती असे दोन अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र आगीने उग्र रुप धारण केल्याने दोन गाड्यांना आग आटोक्यात आणणे शक्य नव्हते. त्यामुळे अंबड, जालना, बीड, माजलगाव नगरपरिषदेचे अशा सहा अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी बोलावण्यात आल्या.
सायंकाळी उशिरापर्यंत आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान युद्धपातळीवर प्रयत्न करत होते. मात्र आग एवढी भीषण होती की या आगीत जिनिंगमधील सुमारे 3 हजार दोनशे कापसाच्या गाठी जळून पूर्णपणे खाक झाल्याने सुमारे 20 कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.