Fri, Apr 26, 2019 15:18होमपेज › Solapur › रेल्वेतील लाचखोर शाखा अभियंत्यास कैद

रेल्वेतील लाचखोर शाखा अभियंत्यास कैद

Published On: Dec 01 2017 11:17PM | Last Updated: Dec 01 2017 10:39PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

विभागीय रेल्वे कार्यालयातील लाचखोर शाखा अभियंता सातलिंग इंगोले यास 41 हजार 500 रूपये लाच  घेतल्याप्रकरणी विशेष न्यायाधीश जाधव यांनी 3 वर्षे कैद व एक लाख रुपये दंडाची  शिक्षा  सुनावली. तर उत्तम चव्हाण, शिल्पा इंगोले या दोघांची निर्दोष मुक्तता केली.

आरोपी   सातलिंग  इंगोले  हा  सोलापूर  येथील  रेल्वे   विभागात  कामाला होता. तक्रारदार व इतर शेतकर्‍यांनी मिळून श्रीगोंदा तालुक्यातील लिंगनगाव या गावात त्यांच्या शेतापर्यंत भोर डाव्या कालव्यावरून सिंचनाकरीता पाईप लाईन करण्याचे ठरविले होते. हे काम करण्यासाठी रेल्वेची लाईन आडवी येत होती. यासाठी थेटे यांनी परवानगी मागण्यासाठी रेल्वे विभागाकडे अर्ज दाखल केला होता. त्यासाठी लागणार्‍या रकमेचा डीडी जोडला होता.

इंगोले  याने या  कामासाठी प्रत्येक शेतकर्‍याकडे 14 हजार रुपयांची मागणी केली होती. अनेकदा  पाठपुरावा केल्यानंतर 50 हजार रूपयांची लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 41 हजार 500 देण्याचे ठरले. लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत पुणे येथील सीबीआयकडे तक्रार केली. सापळा रचून लाच घेताना आरोपीस अटक केली. 

याप्रकरणी सातलिंग इंगोले, उत्तम गणपत चव्हाण, शिल्पा इंगोले या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात तपास अधिकारी गुणासिल यांनी दोषारोप पत्र दाखल केले होते. यात न्यायालयात सरकारी वकील यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपीस 3 वर्षे कैद व एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर आरोपी उत्तम चव्हाण, शिल्पा इंगोले यांची निर्दोष मुक्तता केली. 

यात सरकारकडून अ‍ॅड. आनंद कुर्डुकर, आरोपीकडून अ‍ॅड. राहुल खंडाळ यांनी, तर निर्दोषमुक्त झालेले चव्हाण यांच्याकडून अ‍ॅड. अश्‍विनी कुलकर्णी यांनी काम पाहिले.