Wed, Jan 22, 2020 14:21होमपेज › Solapur › पालिकांसाठी २० टीएमसी पाणी

पालिकांसाठी २० टीएमसी पाणी

Published On: Dec 06 2017 1:41AM | Last Updated: Dec 05 2017 10:37PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

उजनी जलाशयातून सोलापूर शहर, सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा या नगरपालिकांसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणीपुरवठा योजनांसाठी 15 जुलै 2018 पर्यंत 20 टीएमसी पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचा निर्णय आज, मंगळवारी घेण्यात आला.

पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्‍त अविनाश ढाकणे, अधीक्षक अभियंता तथा ‘कडा’चे प्रशासक, शिवाजी चौगुले, भीमा कालवा मंडळाचे अधीक्षक अभियंता रा. ज. कांबळे, उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी आदी उपस्थित होते.

सीना नदीवरून मोहोळ नगरपालिकांसह इतर पाणी वापर संस्थांसाठी सव्वा टीएमसी पाणी फेब्रुवारीनंतर आरक्षित ठेवले जाईल, असे चौगुले यांनी सांगितले. बोरी  नदीतून 0.30 टीएमसी पाणी दुधनी, मैंदर्गी आणि अक्‍कलकोट नगरपालिकांसाठी आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. हिळ्ळी बंधार्‍यासाठी फेब्रुवारी-मार्चमध्ये भीमा नदीतून पाण्याचे एक आवर्तन सोडले जाईल, असे चौगुले यांनी सांगितले.

पिण्यासाठी नदीत पाणी सोडल्यानंतर नदीकाठचा वीजपुरवठा खंडित केला जाईल, असे ना. विजयकुमार देशमुख यांनी सांगितले. यासाठी तहसीलदार, जलसंपदा, महावितरण या विभागांच्या अधिकार्‍यांची समिती नियुक्‍त करावी, अशा सूचना ना. देशमुख यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना दिल्या. चौगुले यांनी बैठकीत पाणीपट्टी थकीत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. सोलापूर महापालिकेकडे 52 कोटींची पाणीपट्टी थकीत आहे, ती भरावी, अशी विनंती त्यांनी केली. जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडेही थकबाकी असल्याचे चौगुले यांनी सांगितले. यावर पाणीपट्टी थकीत असणार्‍या  कारखान्यांबाबत शासकीय नियमांनुसार कारवाई करावी, अशा सूचना देशमुख यांनी दिल्या.

बैठकीस जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता एन. व्ही. जोशी, जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता यू. बी. माशाळे, महावितरणचे कार्यकारी अभियंता आर. एस. खडतरे, एन. एम. गयाळे, बी. के. नागणे आदी उपस्थित होते.