Thu, Apr 25, 2019 17:34होमपेज › Solapur › तौफिक हत्तुरे यांनी राखला काँग्रेसचा गड

तौफिक हत्तुरे यांनी राखला काँग्रेसचा गड

Published On: Apr 07 2018 11:06PM | Last Updated: Apr 07 2018 10:27PMसोलापूर : प्रतिनिधी

संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिलेल्या महापालिका प्रभाग क्र. 14 क च्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने बाजी मारत आपला गड कायम राखला. काँग्रेसचे उमेदवार तौफिक हत्तुरे यांनी या निवडणुकीत नजीकचे प्रतिस्पर्धी एमआयएमचे पीरअहमद शेख यांचा 1604 मतांनी पराभव केला. माकप, भाजप वगळता उर्वरित 6 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.

काँग्रेसचे नगरसेवक रफिक हत्तुरे यांच्या निधनामुळे प्रभाग क्र. 14 क ची पोटनिवडणूक लागली होती. गतवर्षी झालेल्या निवडणुकीत या प्रभागातील एकूण चार जागांपैकी तीन जागा एमआयएमने काबीज केल्या होत्या. तर एका जागेवर रफिक हत्तुरे यांच्यारूपाने काँग्रेसचा विजय झाला होता. सुमारे 25 वर्षांपासून रफिक हत्तुरे हे या परिसराचे प्रतिनिधित्व करीत होते. त्यांच्या निधनाची सहानुभूती मिळण्याच्या तसेच हा गड कायम राखण्याच्यादृष्टीने 

काँग्रेसचे रफिक हत्तुरे यांचे बंधू तौफिक हत्तुरे यांना उमेदवारी दिली होती. त्यांना एमआयएमचे उमेदवार पीरअहमद शेख यांचे प्रमुख आव्हान होते. काँग्रेस व माकप या दोन्ही पक्षांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत  9 उमेदवार रिंगणात होते. मुस्लिमबहुल समजल्या जाणार्‍या या प्रभागाच्या पोटनिवडणुकीत 6 मुस्लिम उमेदवार एकमेकांविरोधात उभे ठाकल्याने मुस्लिम मतांची मोठ्या प्रमाणात विभागणी होणार, असे मानले जात होते. पण निवडणुकीचा निकाल पाहता मुस्लिम मते मोठ्या प्रमाणात हत्तुरे यांना मिळाल्याचे स्पष्ट झाले.

शुक्रवारी या निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले. 45.6 टक्के इतके मतदान झाले. शनिवारी हुतात्मा स्मृती मंदिराच्या मागील जागेत मतमोजणी करण्यात आली. पाच फेर्‍यांमध्ये ही मोजणी पूर्ण झाली. 8 बूथची एक फेरी होती. पहिल्या फेरीपासून हत्तुरे आघाडीवर होते. अंतिम निकालात तौफिक हत्तुरे हे विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर यांनी घोषित केले. हत्तुरे यांना 4944 मते मिळाली. त्यांनी एमआयएमचे उमेदवार पीरअहमद शेख यांचा 1604 मतांनी पराभव केला. शेख यांना 3340 मते मिळाली. भाजप या निवडणुकीत तिसर्‍या स्थानावर राहिला. भाजपचे रणजितसिंग दवेवाले यांना 1921 मतांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेचे उमेदवार बापू ढगे यांना 853, राष्ट्रवादी काँग्रेसचे सद्दाम शाब्दी यांना 900, माकपच्या नलिनी कलबुर्गी यांना 1169, अपक्ष म. गौस कुरेशी यांना 30, वसीम सालार यांना 499 तसेच कय्युम सिद्दीकी यांना 15 मते मिळाली.

51 जणांनी वापरला ‘नोटा’ 

या निवडणुकीत एकूण 51 मतदारांनी आपल्याला 9 पैकी एकही उमेदवार पसंत नसल्याने ‘नोटा’ हे बटण दाबणे पसंत केले. एकही टपाली  मतदान आले नाही. 

20 जणांच्या टीमचे यश : हत्तुरे 


विजयानंतर पत्रकारांशी बोलताना तौफिक हत्तुरे यांनी आपल्या विजयाचे श्रेय मतदारांबरोबरच निवडणुकीत काम केलेल्या 20 जणांच्या टीमलाही दिले. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आ. प्रणिती शिंदे, शहराध्यक्ष प्रकाश वाले, गटनेते चेतन नरोटे आदी नेत्यांनी आपल्या विजयासाठी मोठे प्रयत्न केले. या मतदारांनी या पोटनिवडणुकीत मला मतदान करुन गेली 25 वर्षे या प्रभागात नगरसेवक म्हणून काम केलेल्या रफिक हत्तुरे यांना एकप्रकारे श्रद्धांजली वाहिली आहे, असे भावूक उद्गारही नूतन नगरसेवक तौफिक हत्तुरे यांनी काढले.

मनपातील काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनी हा निकाल गल्ली ते दिल्लीत सत्तेवर असलेल्या भाजपला धडा देणारा ठरल्याची प्रतिक्रिया दिली. खोटी आश्‍वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजपला आता जनता अजिबात थारा देणार नाही व शहराचा विकास केवळ काँग्रेसच करु शकते हे या निकालाने दाखवून दिले आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच बाजी मारणार, असेही नरोटे म्हणाले. विजयानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठा  जल्लोष केला. माजी आ. विश्‍वनाथ चाकोते, नगरसेवक विनोद भोसले आदी मंडळी जल्लोषात सहभागी झाली होती.