Mon, May 20, 2019 18:40होमपेज › Solapur › पंढरपुरात आजी-माजी नगरसेवकांच्यात राडा

पंढरपुरात आजी-माजी नगरसेवकांच्यात राडा

Published On: Dec 26 2017 9:02PM | Last Updated: Dec 26 2017 9:02PM

बुकमार्क करा

पंढरपूर : प्रतिनिधी

आमच्या गल्लीतील कचरा उचलण्याचे टेंडर का घेतले म्हणून सत्ताधारी पंढरपूर - मंगळवेढा विकास आघाडीचे नगरसेवक सुजितकुमार उर्फ राजू सर्वगोड याना शिवीगाळ आणि दमदाटी केल्याची तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांस मारहाण केल्याची फिर्याद शहर पोलिसात दाखल झाली आहे. विशेष म्हणजे दमदाटी करून मारहाण करणारयामध्ये सत्ताधारी आघाडीच्या नगरसेवकांचे वडील आणि माजी नगरसेवक प्रताप गंगेकर यांचे नाव आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. 

याबाबत चे वृत्त असे की मंगळवारी सायंकाळी साडे पाच च्या सुमारास नगरसेवक सुजितकुमार सर्वगोड हे आपल्या भागातील सम्राट चौकात थांबले होते. तेव्हा माजी नगरसेवक प्रताप गंगेकर यांनी अगोदर त्यांना फोन करून माझ्या भागातील  कचऱ्याचे टेंडर का घेतले म्हणून विचारणा केली. त्यावेळी सर्वगोड यांनी हे टेंडर मी नाही तर माझ्या कार्यकर्त्यांनी घेतल्याचे सांगितले. त्यानंतर प्रताप गंगेकर आणि त्यांचा सोबत सम्राट चौकात मोटार सायकलवरून आलेल्या सागर लवूलकर यांनी जातीवाचक शिवीगाळ केली, तसेच सागर लवूलकर याने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर सुजितकुमार सर्वगोड हे पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी निघाले असता पाठीमागून येऊन प्रताप गंगेकर आणि सागर लवूलकर यांनी शिवाजी चौकात सर्वगोड यांचे कार्यकर्ते राजेंद्र उर्फ गोविद सर्वगोड याच्या अंगावर गाडी घालून त्यास जखमी केले. या संदर्भात सुजितकुमार सर्वगोड यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.