Fri, May 24, 2019 08:27होमपेज › Solapur › काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा सोलापूर जिल्ह्यात फज्जा 

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा सोलापूर जिल्ह्यात फज्जा 

Published On: Sep 03 2018 10:02PM | Last Updated: Sep 03 2018 10:02PMपंढरपूर : प्रतिनिधी

 मोठ्या थाटामाटात निघालेल्या काँग्रेस आय पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेचा सोलापूर जिल्ह्यात पाय ठेवतानाच फज्जा उडाला असून नियोजित वेळेपेक्षा तब्बल 5 तास उशिरा यात्रा आल्यामुळे  वाट पाहून कार्यकर्ते घरी निघून गेले. गर्दी अभावी नेत्याना सभा उरकती घ्यावी लागली. विशेष म्हणजे पक्षाचा आमदार असलेल्या पंढरपुरात तर सभा रद्द करावी लागली आहे. नेत्यांच्या राजेशाही थाटामुळे वैतागलेले कार्यकर्ते पक्षाच्या भवितव्याची चिंता करीत निघून गेले.

 काँग्रेस पक्षाची जन संघर्ष यात्रा सोमवारी 4 वाजता माळशिरस तालुक्यात तर साडेपाच वाजता पंढरपूर तालुक्याच्या सीमेवर  येणार होती. मात्र प्रत्यक्षात ही यात्रा सायंकाळी साडे नऊ वाजता माळशिरस येथे आली. आणि पंढरपूर येथे तर 10 वाजल्या नंतरही तिचा थांगपत्ता नव्हता. यात्रेच्या स्वागतासाठी माळशिरस, पंढरपूर येथे थांबलेले कार्यकर्ते वाट पाहून अक्षरशः थकले आणि 5 - 6 तासानंतर आपल्या घरी निघून गेले. पंढरपूर येथे संत तनपुरे महाराज मठात यात्रेच्या सभेचे नियोजन केले होते. मात्र रात्री 10 वाजेपर्यंत यात्रा आली नव्हती त्यामुळे सभेच्या ठिकाणी 10- 20 कार्यकर्ते सुद्धा उपस्थित नव्हते. 

काँग्रेस नेत्यांना वेळेचे भान नाही का ? अशा प्रकारे यात्रा आयोजित केली जात असेल आणि पक्षाचे राज्यातील सर्बोच नेतेच जर वेळेबाबत गंभीर नसतील तर पक्षाला भविष्य कठीण असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया देऊन कार्यकर्ते निघून गेले. रात्री उशिरा पंढरीत आलेले  राज्यातील पक्षाचे बडे नेते सकाळी पत्रकारांना सामोरे जाणार असल्याचे निरोप रात्री 10 वाजता दिले गेले. पक्षाचा आमदार असलेल्या तालुक्यात सभा रद्द करण्याची नामुष्की प्रदेश पातळीवरच्या नेत्यांमुळे आल्याचे पाहून स्थानिक कार्यकर्ते प्रचंड उद्विग्न झाल्याचे दिसून येत आहेत.