Sun, Jan 20, 2019 10:22होमपेज › Solapur › सोलापूर : काँग्रेसच्या आंदोलनाला सहकारमंत्र्यांची उपस्थिती

काँग्रेसच्या उपोषणस्थळी सहकारमंत्री येतात तेव्हा...

Published On: Apr 09 2018 2:51PM | Last Updated: Apr 09 2018 2:51PMसोलापूर : प्रतिनिधी

देशात सामाजिक समता, बंधुत्व आणि शांतता नांदावी यासाठी काँग्रेसच्या वतीने आयोजित उपोषणाला चक्‍क राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी उपस्थिती लावल्याने काँग्रेस नेत्यांना आश्‍चर्याचा धक्‍का बसला.

राज्यातील सर्वच जिल्ह्यात आज काँग्रेसच्या वतीने देशात सामाजिक समता, बंधुत्व आणि शांतता नांदावी यासाठी उपोषण केले जात आहे. सोलापुरातील उपोषणात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सहभाग नोंदवला असून जिल्ह्यातील अनेक दिग्गज पदाधिकारी या उपोषणात सहभागी झाले आहेत. या उपोषणादरम्यान उपोषणस्थळाजवळच असलेल्या श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यालयातील एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून दुपारी बाराच्या सुमारास दाखल झाले. त्यावेळी त्यांना समोरच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले उपोषण दिसले. क्षणाचाही विलंब न लावता देशमुख यांनी उपोषणस्थळाकडे धाव घेत उपोषणास बसलेले सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेत संवाद साधला. यावेळी उभयतांमध्ये काही चर्चाही झाली.

या भेटीबाबत ना. देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, यापूर्वीही आपण सुशीलकुमार शिंदे सोलापूर येत नाहीत, म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या उपोषणस्थळी भेट दिली होती. आज सरकारचा प्रतिनिधी म्हणून गेलो. यात राजकारण नाही. राज्य आणि केंद्रातील सरकार हे सर्वधर्म समभाव मानणारे आणि घटनेनुसार चालणारे सरकार आहे. देशात कोणत्याही प्रकारचा जातीयद्वेष वाढू दिला जाणार नसल्याचे सांगितले.

दरम्यान, राज्याचा एक जबाबदार मंत्रीच विरोधकांच्या आंदोलनात सहभागी झाल्याचे पाहून उपस्थितांना आश्‍चर्याचा धक्‍का बसला.