होमपेज › Solapur › सरकारविरोधात सोलापुरात काँग्रेसचे हाय-फाय उपोषण

सरकारविरोधात सोलापुरात काँग्रेसचे हाय-फाय उपोषण

Published On: Apr 09 2018 10:57PM | Last Updated: Apr 09 2018 10:56PMसोलापूर ः प्रतिनिधी

देशातील वाढत्या असहिष्णुतेबाबत काँग्रेसच्यावतीने केंद्र सरकारविरोधात सोमवारी चार हुतात्मा पुतळा सोलापूर येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्यावतीने उपोषण करण्यात आले. 

भाजप  सरकार केंद्रात व राज्यात सत्तेवर   आल्यापासून   त्यांच्या  चुकीच्या व द्वेषपूर्ण भूमिकेमुळे देशातील शांतता व सामाजिक सलोखा नष्ट झालेला आहे. भाजप शासनाच्या नाकर्तेपणामुळे अनेक ठिकाणी दुर्दैवी घटना घडल्या व हिंसाचारी घटना घडल्या व हिंसाचार उफाळून आला आणि त्यामुळे अनेक निष्पाप जीव बळी पडले. त्याचप्रमाणे देशभरात विविध राज्यांत जाणीवपूर्वक सामाजिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्रातही भीमा-कोरेगाव येथे मराठा व दलित समाजामध्ये जाणीवपूर्वक संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. केंद्र सरकार हे असहिष्णू झाले असल्यामुळे केंद्राविरोधात देशात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आदेशानुसार सोमवारी एक दिवसीय उपोषण करण्यात आले. त्याप्रमाणे सोलापुरातही माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेेतृत्वाखाली हे उपोषण करण्यात आले. सुरुवातील माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उपोषणास सुरुवात करण्यात आली.

या उपोषणास आ. प्रणिती शिंदे, आ. सिद्धाराम म्हेत्रे, आ. रामहरी रुपनवर, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष  प्रकाश  पाटील, शहर  काँग्रेस  कमिटीचे  अध्यक्ष  प्रकाश वाले, माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार विश्‍वनाथ चाकोते,  प्रदेश काँग्रेस सरचिटणीस प्रकाश यलगुलवार, धर्मा भोसले, अलका राठोड,   माजी महापौर सुशीला आबुटे, नलिनी चंदेले, संजय हेमगड्डी, यु.एन. बेरिया, पक्षनेते चेतन नरोटे, दत्ताअण्णा सुरवसे, काँग्रेसचे सर्व नगरसेवक, पक्षाच्या विविध विभागांचे अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

हाय-फाय उपोषण

केंद्रातील भाजप सरकारविरोधात सोमवारी काँग्रेसच्यावतीने संपूर्ण देशभरात उपोषण करण्यात आले. सोलापुरातही माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चार पुतळा चौकात उपोषण करण्यात आले. यावेळी उपोषणस्थळी भव्य मंडप उभारण्यात आला होता. 

उपोषणाला बसलेल्या नेतेमंडळी व कार्यकर्त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून उपोषणस्थळी पंखे, जमिनीवर मॅट व त्यावर गादी, पिण्याच्या थंडगार पाण्याची सोय करण्यात आली होती. उपोषणस्थळी साऊंड स्पिकर लावून त्यावर देशभक्‍तीपर गीते लावण्यात आली होती. एकंदरीत उपोषणस्थळाचा सर्व माहोल पाहता हे एक हाय-फाय उपोषण झाल्याची चर्चा उपोषण स्थळावर ऐकावयास मिळाली.

Tags: solapur, solapur news, congress, sushil kumar shinde, hunger protest