Fri, Aug 23, 2019 21:06होमपेज › Solapur › पोलिस आयुक्‍त-भाजप अध्यक्षांमध्येच जुंपली!

पोलिस आयुक्‍त-भाजप अध्यक्षांमध्येच जुंपली!

Published On: Apr 27 2018 11:01PM | Last Updated: Apr 27 2018 10:40PMसोलापूर ः प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोलापूर दौर्‍यादरम्यान विमानतळावर स्वागतासाठी आलेल्या लोकप्रतिनिधी, माजी आमदार, माजी मंत्री यांना विमानतळावर जाण्यापासून रोखल्याने पोलिस आयुक्‍त आणि भाजप जिल्हाध्यक्ष यांच्यात जोरदार शाद्बिक चकमक उडाली. विशेष म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सहकारमंत्री यांच्यासमोरच हा प्रकार घडला. अखेर पोलिस आयुक्तांनी नरमाईची भूमिका स्वीकारत उपस्थितांना प्रवेश दिल्याने वादावर पडदा पडला. या प्रकाराची दिवसभर पोलिस दलात चर्चा रंगली होती.

राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस हे शुक्रवारी सकाळी विशेष विमानाने सोलापुरात आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी सोलापूर दौर्‍यावर आले होते. मुख्यमंत्री येणार असल्यामुळे मंत्रिमंडळातील जिल्ह्याचे मंत्री असलेले सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासह भाजपचे शहर-ग्रामीणचे प्रमुख पदाधिकारी, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर, प्रशासनातील प्रमुख अधिकारी हे राजशिष्टाचाराप्रमाणे मुख्यमंत्री यांच्या स्वागतासाठी विमानतळावर दाखल झाले होते. याचवेळी भाजपचे शहराध्यक्ष अशोक निंबर्गी आणि ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार हेही सहकारमंत्री यांच्यासमवेत विमानतळावर दाखल झाले होते. यावेळी विमानतळावरील मुख्य प्रवेशद्वारावर माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार नरसिंग मेंगजी यांच्यासह काही पदाधिकारी हे ताटकळत उभे राहिल्याचे दिसून आले. यावेळी शहाजी पवार यांनी सुरक्षारक्षकांना ताटकळत उभ्या असलेल्या पदाधिकार्‍यांना सोडण्याबाबत विनंती केली. मात्र संबंधित कर्मचारी यांनी वरिष्ठांनी आदेश  दिल्याशिवाय आत सोडणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यावर पवार यांचा पार चढला. मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला माजी पालकमंत्री, माजी आमदार यांनाच सोडले जात नसेल तर काय करायचे असे म्हणत त्यांनी ही बाब विमानतळाच्या अँटिचेंबरमध्ये बसलेल्या पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि पोलिस आयुक्‍त महादेव तांबडे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर पालकमंत्री देशमुख आणि तांबडे यांनी गेटवर धाव घेत काय झाले याची पाहणी केली. त्यावेळी सहकारमंत्री देशमुख यांनीही तांबडे यांच्याकडे प्रमुख पदाधिकार्‍यांना न सोडल्याबाबत नाराजी व्यक्‍त केली. त्यानंतर तांबडे यांनी पासेस काढण्याबाबत सूचना केल्या होत्या आपण संबंधितांना, असे सांगितले. हाच मुद्दा पकडून शहाजी पवार यांनी मी सकाळपासून पास काढण्यासाठी कार्यकर्त्याला पोलिस आयुक्‍तालयात पाठविले आहे, परंतु त्याठिकाणी कुणीही उपस्थित नाही, अधिकारी उडवाउडवीची उत्तर देतात, मग आम्ही काय करायचे, असा सवाल करीत तांबडे यांना धारेवर धरले. जवळपास दहा मिनिटे ही ‘तू तू, मै मै’ रंगली होती. पोलिस आयुक्‍तांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्‍त करत शहाजी पवार आणि शहराध्यक्ष अशोक निंबर्गी, राज्य सहकारी बँकेचे संचालक अविनाश महागावकर यांनी बाहेर निघून जाण्याची भूमिका स्वीकारली. अखेर दोन्ही मंत्र्यांनी समजूत काढत उपस्थितांना विमानतळ परिसरात सोडल्यानंतर या वादावर पडदा पडला आणि सर्वजण मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी रवाना झाले. 

दोन मंत्र्यांच्यासमोरच पोलिस आयुक्‍त आणि भाजप पदाधिकारी यांच्यामध्ये झालेल्या वादावादीची विमानतळ तसेच पोलिस दलात चांगलीच चर्चा रंगली होती.