Mon, Aug 26, 2019 13:05होमपेज › Solapur › सोलापुरात आयुक्‍तच घुसले 'वन वे'त

सोलापुरात आयुक्‍तच घुसले 'वन वे'त

Published On: Dec 26 2017 7:34PM | Last Updated: Dec 26 2017 7:34PM

बुकमार्क करा

सोलापूर : पुढारी ऑनलाईन

मनपा आयुक्त, महापौर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी यांनीच पोलिस आयुक्तांसोबत एकेरी वाहतुकीचा नियम पायदळी तुडवला असेल तर कारवाई कुणावर करणार असा प्रश्‍न आज, मंगळवारी सर्वसामान्य सोलापूरकरांना सतावत होता. सिध्देश्‍वर यात्रेच्यानिमित्ताने नंदीध्वज मार्गाची पाहणी करण्यासाठी शहरातील मार्गांवर अधिकारी फिरत होते. यावेळी चक्क वन-वेचा नियम मोडून अधिकार्‍यांनी मार्गाची पाहणी केली. आपण नियम तोडतोय याचे कसलेही भान या अधिकार्‍यांना नव्हते, हे विशेष.

सोलापूर शहराचे ग्रामदैवत सिध्देश्‍वर यात्रेच्या तयारीला सुरूवात झाली आहे. याच अनुषंगाने आज, मंगळवारी मनपा, पोलिस यांच्यासह मंदिर समितीच्या पदाधिकार्‍यांनी संयुक्तपणे नंदीध्वज मार्गाची पाहणी केली. या पाहणी दौर्‍यात महापौर शोभा बनशेट्टी, आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, पोलिस आयुक्त महादेव तांबडे, सहायक पोलिस आयुक्त अपर्णा गीते, दीपाली काळे, यात्रेचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांच्यासह जवळपास दहा ते बारा गाड्यांचा ताफा या पाहणी दौर्‍यात सहभागी झाला होता. 

नंदीध्वज मार्गाची पाहणी करत असतानाच हा ताफा सिध्देश्‍वर मंदिर पास करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात दाखल झाला. यानंतर हा ताफा लकी चौकाकडे पाहणीसाठी जाणार होता. त्यामुळे ताफ्याचा मार्ग हा हॉटेल सिटी पार्क मार्गाने असताना अचानक यातील सर्व वाहने एकेरी वाहतूक असलेल्या पार्क स्टेडियमच्या बाजूच्या रस्त्याने निघाला. आपण वन-वे वाहतुकीचा नियम मोडतोय याची पुसटशी कल्पनाही नव्हती. नियम तुडवत हा ताफा चार पुतळामार्गे लकी चौकात दाखल झाला. एरवी या मार्गावरुन दुचाकी गाड्यांसाठीही नो- पार्किंग आहे. या मार्गावरुन एखादी गाडी गेली तर तात्काळ वाहतूक शाखेकडून कारवाई केली जाते. 

आज चक्क पोलिस आयुक्तांसह बड्या अधिकारी, पदाधिकार्‍यांनी एकेरी वाहतुकीचा नियम मोडल्यामुळे त्यांच्यावर कारवाई कोण करणार, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.