Sat, Jul 20, 2019 21:18होमपेज › Solapur › मतभेद विसरून नवा इतिहास निर्माण करू : सुशीलकुमार शिंदे

मतभेद विसरून नवा इतिहास निर्माण करू : सुशीलकुमार शिंदे

Published On: Feb 15 2018 10:31PM | Last Updated: Feb 15 2018 9:20PM सोलापूर ः प्रतिनिधी 

जुन्या पिढीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून भविष्यात नवा इतिहास निर्माण करून त्यासाठी सर्वांनी आपापसातील मदभेत विसरून एकत्र या, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेसच्या नेत्यांना केले आहे.

बेलाटी येथील ब्रह्मदेवदादा माने इन्स्टिट्यूट येथे स्व. ब्रह्मदेवदादा माने यांच्या 89 व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. यावेळी आ. सिद्धाराम म्हेत्रे, आ. प्रणिती शिंदे, उज्ज्वलाताई शिंदे, माजी आ. दिलीप माने, विश्‍वनाथ चाकोते, बाळासाहेब शेळके, राजशेखर शिवदारे, सुरेश हसापुरे आदी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, राजकारण 

आणि समाजकारणात रागावर नियंत्रण मिळवून लोकांची कामे करणे महत्त्वाचे असते. त्यासाठी थोरा-मोठ्यांचा आशीर्वाद आणि आदर्श समोर ठेवावा लागतो. तो आदर्श स्व. ब्रह्मदेवदादा माने यांच्याकडून आपल्याला मिळाला आहे. त्यामुळे भविष्यात लोकांच्या सेवेसाठी अनेक निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेते मंडळींनी एकत्र यावे, असे आवाहन केले. तसेच आपण एकत्र येऊन काम केल्यास भविष्यात नवा इतिहास आपण निर्माण करू, असा विश्‍वासही शिंदे यांनी यावेळी व्यक्‍त केला.

तर यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे यांनी राजकारणातील काही जुना आठवणींना उजाळा दिला. यावेळी ब्रह्मदेवदादा माने यांनी मला कशी मदत केली. त्यामुळे मी राजकारणात पुढे आलो, असे सांगत असताना त्यांच्या उपकाराची जाणीव ठेवून मीही माजी आ. दिलीप माने यांना मनापासून मदत करीत होतो. मात्र त्यांनी यापुढे माझ्या भावना लक्षात घेऊन चिल्लर गोष्टींकडे लक्ष न देता राजकारण करावे, असा सल्ला दिला. 

यावेळी आ. सिद्धाराम म्हेत्रे यांनी आगामी निवडणुकांकडे लक्ष वेधत माजी आ. माने यांनी या जयंती सोहळ्याचे आयोजन करून राजकीय वातावरण तापविण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले. यावेळी ब्रह्मदेवदादा माने इन्स्टिट्यूटमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच ब्रह्मदेवदादा माने यांच्या पूर्णाकृती पुतळ्यालाही यावेळी अभिवादन करण्यात आले. प्रकाश पाटील, प्रकाश वाले, अशोक देवकते यांच्यासह काँग्रेसचे नगरसेवक, जिप सदस्य, गावोगावचे सरपंच, उपसरपंच तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शिरिष भोसले, प्रास्ताविक दिलीप माने, विश्‍वजित माने यांनी केले, तर शेवटी आभार धनंजय भोसले यांनी मानले.