होमपेज › Solapur › म्हशीच्या पोटातून काढला ताडपत्रीचा गोळा

म्हशीच्या पोटातून काढला ताडपत्रीचा गोळा

Published On: Aug 12 2018 1:03AM | Last Updated: Aug 11 2018 11:02PMबार्शी : तालुका प्रतिनिधी 

आपल्या आर्थिक परिस्थितीला थोडाफार हातभार लागावा म्हणून तब्बल 70 हजार रूपये खर्चून घेतलेल्या मुरा जातीच्या म्हशीने ताडपत्री गिळल्यामुळे चिंतेत असलेल्या पांगरीच्या शेतकर्‍याला दिलासा मिळाला आहे. सलग चार तास शस्त्रक्रिया करून म्हशीच्या पोटातून ताडपत्री काढण्यात वैद्यकीय अधिकार्‍यांना यश आले आहे. दुग्धोत्पादनासाठी सत्तर हजार रुपये खर्चून घेतलेल्या म्हशीने अचानक खाणे-पिणे सोडले होते.गोठ्यातली म्हैस जागेवरच बसून होती. पोट फुगून अवाढव्य झाले होते. जीभ बाहेर पडली होती. पांगरी, ता. बार्शी येथील शंकर धर्मराज कांबळे हे शेतकरी गेल्या आठ दिवसांपासून चिंतेत होते. 

आपल्या पाळीव म्हशीला काय झाले यामुळे चिंतातूर झालेल्या शेतकर्‍याने धावपळ सुरू करून पशुवैद्यकीय अधिकार्‍यास याची माहिती दिली. 5 वर्ष वयाची मुरा जातीची म्हैस त्यांनी एक वर्षापूर्वी विकत घेतली होती. सध्या तिचे 3 रे वेत असून 8 वा महिना आहे.सुरूवातीला म्हशीने खाणे सोडले. त्यामुळे वैद्यकीय अधिकार्‍यास बोलावून घेऊन म्हशीची तपासणी करण्यात आली. मात्र तो उपचार लागू पडला नाही. म्हैस रवंथ करत नसल्याने पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी हेरून म्हशीने पचन न होणारी एखादी वस्तू खाल्ली अथवा श्‍वसननलिकेत काहीतरी  अडकले असावे असे निदान करण्यात  आले.

वैराग केंद्राची कामगिरी

वैराग केंद्राचे डॉ. प्रमोद मांजरे यांना याबाबत माहिती देण्यात आल्यानंतर ते आपल्या पथकासह पांगरी येथील झानपूर रस्त्यावरील कांबळे यांच्या गोठ्यावर पोचले. पाहणीनंतर व प्रत्यक्ष पाहाणी केल्यानंतर डॉ. मांजरे यांनी तातडीने म्हशीवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

म्हशीला मिळाले जीवदान

शस्त्रक्रिया करून म्हशीच्या श्‍वसननलिकेत  अडकलेला अर्ध्या किलोपेक्षाही जास्त वजनाचा ताडपत्रीचा गोळा काढण्यात आला. गोळा काढून शेवटचा टाका घेताच शेवटच्या घटका मोजत असलेली म्हैस जागेवर उठून उभी राहिली. शस्त्रक्रियेनंतर म्हैस उठून उभी राहिल्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांनी समाधान व्यक्त करत सुटकेचा नि:श्‍वास सोडला.