होमपेज › Solapur › अन्यथा ३ महिन्यांत सोलापूर मनपा बरखास्त करुः मुख्यमंत्री

अन्यथा सोलापूर मनपा बरखास्त करुः मुख्यमंत्री

Published On: Jan 11 2018 5:00PM | Last Updated: Jan 11 2018 5:04PM

बुकमार्क करा
सोलापूरः प्रतिनिधी 

सोलापूर महापालिकेत पक्षांतर्गत गटबाजीच्या राजकारणामुळे भाजपची होत असलेली बदनामी आतातरी थांबवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेमुळे तुम्ही निवडून आलात हे लक्षात घ्या. यापुढे गटतट विसरुन एकदिलाने कारभार करा, अन्यथा तीन महिन्यांत मनपा बरखास्त करु असा गर्भित इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी बुधवारी मध्यरात्री सोलापूर मनपाच्या पदाधिकारी व गटबाजी करणार्‍या नगरसेवकांना दिला.

दहा महिन्यांपूर्वी मनपात सत्तेवर आलेल्या भाजपला पालकमंत्री विजयकुमार देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख या दोन गटांच्या एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या राजकारणामुळे पुरते ग्रासले आहे. या गटातटांचे राजकारण टोकाला गेल्याने भाजपची अब्रु अनेकवेळा वेशीला टांगल्याचे सर्वश्रुत आहे. यामुळे भाजपची मोठी बदनामी होऊन जनमानसातील प्रतिमा मलीन झाली आहे. 

काही महिन्यांपूर्वी गाळेभाडे वाढ विषयाच्या मुद्यावरुन या दोन गटांनी वेगवेगळी भूमिका घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही गटांना सुनावले होते. मात्र या दोन गटांच्या वागण्यात तसूभरही फरक पडला नाही.  मनपा सभागृह नेते सुरेश पाटील गेल्या महिन्यापासून आजारी पडल्यापासून हे पद कोणी घ्यायचे यावरुन दोन्ही गटांत वाद निर्माण झाला होता. या कारणाच्या निमित्ताने सहकारमंत्री गटावर मनपा सभेत कुरघोडी करण्याचा प्रयत्न पालकमंत्री गटाने केला खरा पण सहकारमंत्री गटाने शिवसेना, एमआयएमची मदत घेऊन मोठ्या खुबीनी ही खेळी उधळून लावली. या घटनेमुळे पुन्हा एकदा भाजपच्या अब्रुचे धिंडवडे निघाल्यावर प्रदेश भाजप व मुख्यंमत्र्यांनी याची गंभीर दखल घेतली. 

मंगळवारी स्थानिक दोन्ही मंत्री, शहराध्यक्ष, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती यांना मुंबईला येण्याचे फर्मान पक्षाने काढल्यानंतर बुधवार सकाळी हे सर्वजण मुंबईला पोहोचले. यानंतर अचानक भाजपच्या सर्व नगरसेवकांनादेखील तातडीने मुंबईला येण्याचे आदेश पक्षाने दिले. यामुळे मिळेल त्या वाहनांनी नगरसेवकांनी बुधवारी रात्री मुंबई गाठली.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी रात्री सव्वा अकराच्या सुमाररास बैठकीला सुरुवात झाली. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, महापौर शोभा बनशेट्टी, उपमहापौर शशिकला ब त्तुल, स्थायी समिती सभापती संजय कोळी,  राष्ट्रीय भाजपचे संघटक व्ही. सतीश, प्रदेश भाजपचे संघटक सचिव तथा सोलापूरचे निरिक्षक रवि अनासपुरे, उमा खापरे यांच्यासह दोन्ही गटांचे नगसेवक यावेळी उपस्थित होते.