Tue, Jun 25, 2019 13:09होमपेज › Solapur › स्वच्छ भारत सर्वेक्षणात नागरिकांनी सहभागी व्हावे 

स्वच्छ भारत सर्वेक्षणात नागरिकांनी सहभागी व्हावे 

Published On: Aug 12 2018 1:03AM | Last Updated: Aug 11 2018 9:01PMसोलापूर : प्रतिनिधी

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत केंद्र शासनाकडून ग्रामीण भागातील गावातील स्वच्छता, घनकचरा व सार्वजनिक शौचालयांची सुविधा याबाबत 31 ऑगस्टपर्यंत सर्वेक्षण करण्यात येत असून या मोहिमेत नागरिकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले आहे. 

या सर्वेक्षणाबाबतची माहिती पत्रकारांना देताना डॉ. भारुड म्हणाले, ग्रामीण भागात स्वच्छता, घनकचरा व शौचालय याबाबत काय सुविधा झाल्या आहेत, नागरिकांचा प्रतिसाद यास कसा आहे हे जाणून घेण्यासाठी 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईलवरील गुगल प्लेमधून एसएसजी 18 हे अ‍ॅप डाऊनलोड करावे. यात नागरिकांना विचारलेल्या चार प्रश्‍नांना उत्तरे देण्यात यावीत. यासाठी अतिरिक्‍त 5 गुण देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

एकूण शंभर गुणाच्या आधारावर ग्रामीण भागातील स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन व शौचालयांची सुविधा तपासणी करण्यात येत आहे. यात अ, ब, क असे वर्गीकरण करण्यात आले आहे. अ गटात सार्वजनिक शौचालयांबाबत तपासणी होत असून यासाठी 30 गुण देण्यात येणार आहेत. ब गटात नागरिकांनी दिलेल्या सहभागाबाबत 35 गुण, जनजागृती व नागरिकांकडून मिळणार्‍या प्रतिसादाला 35 गुण देण्यात येत आहेत. आतापर्यंत नाशिक, पुणे, सातारा या तीन जिल्ह्यांतील नागरिकांनी या सर्वेक्षणात सकारात्मक प्रतिसाद दिल्याने हे जिल्हे सध्या अग्रस्थानी  आहेत. 

सोलापूर जिल्हा चौथ्या क्रमांकावर असून नागरिकांनी प्रतिसाद दिला तर या उपक्रमात सोलापूर जिल्हा अग्रस्थानी येणार असून यामुळे केंद्र शासनाकडून घनकचरा व्यवस्थापन व सार्वजनिक शौचालयांसाठी निधी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. 

जिल्हा परिषदेचा सुमारे 40 हजार कर्मचारीवर्ग असून या कर्मचार्‍यांच्या सहकार्याने ग्रामीण भागात या मोहिमेबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. जि.प. व पंचायत समिती पदाधिकार्‍यांचेही योगदान यासाठी घेण्यात येत आहे.आतापर्यंत 6 हजार नागरिकांनी ऑनलाईन प्रतिसाद दिला आहे. सोलापूर जिल्ह्यात 4 लाख 86 हजार कुटुंबे असून यापैकी किमान 5 टक्के कुटुंबांनी ऑनलाईन प्रतिसाद दिला, तर सोलापूरला अतिरिक्‍त पाच टक्के गुण मिळणार आहेत. 

31 ऑगस्टपर्यंत सुरु असणार्‍या या उपक्रमात ग्रामीण भागातील नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन यानिमित्ताने डॉ. भारुड यांनी केले आहे. विद्यार्थी व युवकांत याबाबत जनजागृती करण्यासाठी 14 ऑगस्ट रोजी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधण्याचा उपक्रमही हाती घेण्यात येत असल्याचे डॉ. भारुड यांनी सांगितले. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय लोंढे, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवदत्त गिरी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव आदी उपस्थित होते.