Thu, Aug 22, 2019 12:52होमपेज › Solapur › पंढरपुरात व्यापार्‍यांची पोलिसांशी हुज्जत

पंढरपुरात व्यापार्‍यांची पोलिसांशी हुज्जत

Published On: Jan 25 2018 1:00AM | Last Updated: Jan 25 2018 1:00AMपंढरपूर : प्रतिनिधी

माघी यात्रेत भाविकांना त्रास होऊ नये म्हणून नगरपालिकेने शहरातील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई सुरू केली आहे. यामोहिमेला मंदिर परिसरातील व्यापार्‍यांनी विरोध केला. पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यात येत असतानाही पोलिसांशी हुज्जत घालत दुपारपर्यंत दुकाने बंद ठेवण्यात आली. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर पुन्हा दुकाने सुरू केली.

माघी यात्रा सुरू झाली असून 28 रोजी एकादशीचा मुख्य सोहळा साजरा होत आहे. त्याअनुषंगाने नगरपालिका प्रशासनाच्यावतीने शहरातील अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.  बुधवारी सकाळी पोलिस बंदोबस्तात नगरपालिका प्रशासनाने अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली असता मंदिराच्या पश्‍चिमद्वाराकडील व्यापार्‍यांनी विरोध करीत अडथळा निर्माण केला. याप्रसंगी पोलिस व व्यापारी यांच्यात शाब्दिक वादावादी झाली. शहरात भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले असल्याने या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाली होती. अतिक्रमण हटविण्यासाठी आलेल्या नगरपालिका कर्मचार्‍यांना व पोलिसांशी हुज्जत घालत व्यापार्‍यांनी  दुकाने बंद ठेवून ठिय्या मांडला.  अखेर पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी नियम मोडून अतिक्रमण केलेल्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले.  प्रशासनाला सहकार्य करून व्यापार्‍यांनी अतिक्रमण काढून घ्यावी,अन्यथा कारवाई करून अतिक्रमण काढणार असल्याचा इशारा देण्यात आला. तेव्हा व्यापार्‍यांनी अतिक्रमण काढून घेण्यासाठी काही तासांचा अवधी देण्याची विनंती करीत पुन्हा दुकाने सुरू केली.