Wed, Apr 24, 2019 11:37होमपेज › Solapur › स्वच्छता अ‍ॅपवर तक्रारींचा ढिगारा; कारवाईही वेगात

स्वच्छता अ‍ॅपवर तक्रारींचा ढिगारा; कारवाईही वेगात

Published On: Dec 01 2017 11:17PM | Last Updated: Dec 01 2017 10:42PM

बुकमार्क करा

सांगोला : वार्ताहर

शासनाकडून स्वच्छतेच्या तक्रारीसाठी मोबाईल अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांनी आपल्या शहराची निवड करून अस्वच्छतेसंदर्भातील तक्रार यात नोंद करावयाची आहे. या तक्रारींची दखल घेऊन सांगोला नगरपालिकेकडून तात्काळ तक्रार नोंदविणार्‍या परिसराची स्वच्छता करण्यात येत आहे. त्यामुळे हे स्वच्छता अ‍ॅप शहरासाठी स्वच्छता दूतच बनत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्‍त केले जात आहे. 

स्वच्छ भारत अभियान सर्व शासकीय विभागांकडून अगदी जोर लावून राबविण्यात येत आहे. आरोग्याच्यादृष्टीने नागरिक राहात असलेला परिसर स्वच्छ असणे गरजेचे आहे. स्वच्छता हीच आरोग्याची गुरुकिल्ली आहे. हे जितके खरे आहे, तितकीच आव्हानाची बाब म्हणजे एका बाजूला शहराचा विस्तार वाढत आहे. त्याचबरोबर दुसर्‍या बाजूला स्वच्छतेचा प्रश्‍नही वाढत आहे. याचा खरा ताण स्वच्छता करणार्‍या कर्मचार्‍यांवर पडत आहे. शहरात कोणत्या भागात व कोणत्या परिसरात कचरा किंवा अस्वच्छता आहे याची माहिती सहजासहजी नगरपालिकेस मिळत नाही. तर नगरपालिकेत जाऊन तक्रार करणे हे नागरिकांसाठी सोपे नाही. यामुळे स्वच्छता अ‍ॅपच्या माध्यमातून शहरातील कचरा साफ करण्यास सोपे बनले आहे. 

शहरातील अनेक नागरिकांकडून स्वच्छता अ‍ॅप मोबाईलमध्ये घेतले आहे. हा अनोखा उपक्रम नागरिकांच्या नेटकरींसाठी पसंतीचा ठरत आहे. घरबसल्या तर अनेकवेळा येता-जाता अनेक वेळा ज्याठिकाणी अस्वच्छता दिसत आहे, त्याठिकाणचा फोटो काढून व ते ठिकाण कोणते आहे, याची माहिती त्या अ‍ॅपमध्ये डाऊनलोड करण्याची व्यवस्था आहे. तक्रार दाखल होताच आरोग्य विभागाकडून लवकरात लवकर त्याची दखलही घेण्यात येते. तसेच ज्या परिसरातील अस्वच्छतेची तक्रार नागरिकांनी केली आहे, त्याची स्वच्छता झाल्यानंतर त्याच अ‍ॅपवर नगरपालिकेकडून स्वच्छ परिसराचा फोटो काढून टाकण्यात येतो. त्यामुळे ज्या नागरिकांना आपल्या तक्रारीचे निवारण झाल्याची माहिती मिळते.