Tue, Apr 23, 2019 08:24होमपेज › Solapur › दूध बंद आंदोलनामुळे बालगोपाळ आनंदित

दूध बंद आंदोलनामुळे बालगोपाळ आनंदित

Published On: Jul 19 2018 1:40AM | Last Updated: Jul 18 2018 8:51PMकुर्डुवाडी : विनायक पाटील

एकीकडे दुधाला दर मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडला असली तरी दुसरीकडे शेतकर्‍यांनी केलेल्या दूध बंद आंदोलनामुळे मात्र बालगोपाळ आता आपल्याला रोज गुलाबजामून खायला मिळणार म्हणून आनंदित झाल्याचे चित्र आहे. 

दुधाला 17 रुपये दर मिळतो आहे. तोट्यात चालणारा हा दुधाचा धंदा आता शेतकर्‍याला परवडेनासा झालेला आहे. म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध बंद आंदोलनाचे हत्यार उपसले. ग्रामीण भागात घरोघरी दूध मोठ्या प्रमाणात आहे.  या दुधाचा खवा करून त्याचे गुलाबजामून करण्यात महिला व्यस्त आहेत.

आजच्या घडीला दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या जीवनात अच्छे दिन तर अजिबात नाहीत. 26 रुपये मिळणारा दुधाचा दर आज अक्षरशः 16 ते 17 रुपये मिळतो आहे. 10 रुपये प्रतिलिटर दुधात झालेली कपात ही दूध उत्पादकांचा संसार उघड्यावर पाडणारी झालेली आहे. 

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विविध आंदोलनाचे केंद्र हे माढा तालुका आहे. दूध बंद आंदोलन सुरू व्हायच्या आदल्या रात्री रविवारी रिधोरे, तालुका माढा येथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी नेचर दूध वाहतूक करणार्‍या टेम्पोतील हजारो दुधाच्या पिशव्या रस्त्यावर फेकून देऊन या आंदोलनाचा श्रीगणेशा केला. 

कुर्डु गावात 25 हजार लिटर दुधाचे संकलन होते. त्या गावातून सोमवारी दुधाचा एक थेंबही गावाबाहेर गेलेला नाही. सर्व दूध उत्पादकांनी एकी केलेली आहे. 8 दिवस दुधाचा एक थेंबही विकायचा नाही. त्यामुळे आता घरोघरी दुग्धजन्यपदार्थ करण्यावर भर दिला जात आहे. शाळेतही मुले एका डब्यात गुलाबजामून, तर दुसर्‍या डब्यात दूध घेऊन येत आहेत.दूध उत्पादकांचा संप मिटेपर्यंत तरी घरोघरी दुधाचा खवा होतो आहे व या खव्याचे गुलाबजामून खायला मिळाल्याने बालगोपाळ आनंदित आहेत.