Thu, Jul 18, 2019 21:46होमपेज › Solapur › असिफाच्या गुन्हेगारांना फाशी द्या

असिफाच्या गुन्हेगारांना फाशी द्या

Published On: Apr 21 2018 10:38PM | Last Updated: Apr 21 2018 10:25PMपंढरपूर : प्रतिनिधी

कठुआ येथील आठ वर्षीय असिफा, उन्नाव, सुरत आणि इतर ठिकाणी उघडकीस आलेल्या बाललैंगिक अत्याचार आणि खून प्रकरणातील आरोपींना तातडीने फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी पंढरपुरात सर्व धर्मीय, सर्व पक्षीय नागरिकांचा भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. विविध सामाजिक, राजकीय संघटनांसह पदाधिकारी, युवक, महिला, नागरिक या मोर्चामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. 

गेल्या चार दिवसांपासून सोशल मीडियावर या मोर्चासंदर्भात आवाहन करण्यात येत होते. त्या आवाहनास मोठ्या प्रमाणात  प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेला हा मोर्चा लहान मुलींच्या नेतृत्वाखाली मूकपणे, शांततेत तहसील कार्यालयावर आला. मोर्चाच्या मार्गात असलेल्या राजमाता अहिल्यादेवी, राष्ट्रमाता जिजाऊ, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मुलींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मोर्चा पुढे मार्गस्थ झाला. तहसील कार्यालय येथे आल्यानंतर  मोर्चाचे नेतृत्व करणार्‍या मुलींनी आपले मनोगत व्यक्त केले. या मोर्चात मुस्लिम, हिंदू, बौद्ध धर्मातील महिला, युवक, पुरुष आणि वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  

आ. भारत भालके, आ. प्रशांत परिचारक, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांच्यासह काँग्रेस,राष्ट्रवादी, शिवसेना, रिपाई, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, बहुजन समाज पार्टी, भारिप बहुजन महासंघ यासह सर्व पक्षीय राजकीय नेते, पदाधिकारीही उपस्थित होते. मोर्चामध्ये महिला, लहान मुलींपासून युवक, युवतींचा सहभाग लक्षणीय होता. मोर्चात सहभागी महिलांच्या हातात विविध मागण्या करणारे आणि लैंगिक अत्याचार घटनेचा निषेध करणारे फलक होते. मोर्चा तहसीलदार कार्यालयावर आल्यानंतर नाजिया शेख, सिद्दीका जुबेर बागवान, गौसिया अनवर खान, बुशरा बागवान, मदीहा भडाळे, समन मीरजकर यांनी नायब तहसीलदार यांच्याकडे राष्ट्रपतींना लिहिलेले निवेदन दिले. 5 ते 7 हजार नागरिकांच्या सहभागात हा मोर्चा अतिशय शांततेत पार पडला.