सोलापूर : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वप्रथम सर्वधर्म समभावाचा संदेश दिला असून छत्रपतींचे आपण सर्व पाईक असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.
श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या सिंहासनाधिष्ठित छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना शिंदे आणि महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते सोमवारी सकाळी डाळिंबी आड मैदान येथे करण्यात आली. सोलापूर शहरात सोमवारपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीस शुभारंभ झाला असून 19 फेबु्रवारी रोजी दिमाखदार मिरवणुका निघणार आहेत.
सोलापूर शहरात श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक मंडळांकडून शिवजयंती साजरी करण्यात येते. या उत्सवास सोमवारी प्रारंभ झाला. यावेळी महापौर बनशेट्टी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित मूर्तीस माजी शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी जिजाऊ वंदना म्हटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची आरती म्हणण्यात आली. त्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’ च्या घोषणांनी डाळिंबी आड मैदानाचा परिसर दणाणून सोडला होता. याप्रसंगी शिवसम्राज्ञी ढोल पथकातील मुलींनी नाशिक ढोलचे वादन करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. याप्रसंगी महामंडळाचे अध्यक्ष रसूल पठाण, धर्मा भोसले, दिलीप कोल्हे, पद्माकर काळे, नगरसेवक चेतन नरोटे, सुनील रसाळे, दास शेळके, राजन जाधव, मनोज गादेकर, दत्तात्रय ताटे, राजन कामत, प्रताप चव्हाण, तुकाराम मस्के, विजय पुकाळे, जगदीश पाटील, शेखर फंड, चेतन चौधरी, किरण पवार, अर्जुन सुरवसे, श्रीकांत डांगे, निरंजन बोध्दूल, अण्णा रोडगे, भाऊ रोडगे, महेश सावंत, बिज्जू प्रधाने, लहू गायकवाड, अंबादास शेळके, सचिन स्वामी, माऊली पवार, दत्ता मुळे, नंदा शिंदे, दीपा शिंदे, गीतांजली जाधव आदी उपस्थित होते.