Sun, Mar 24, 2019 12:27होमपेज › Solapur › मध्य रेल्वेचा चाळीस दिवसांचा ब्लॉक

मध्य रेल्वेचा चाळीस दिवसांचा ब्लॉक

Published On: Jan 19 2018 2:01AM | Last Updated: Jan 18 2018 10:44PMसोलापूर : प्रतिनिधी

इंजिनिअरिंग कॉरिडॉरसाठी मध्य रेल्वेने चाळीस दिवसांचा (26 फेब्रुवारीपर्यंत) ब्लॉक घेतला आहे. या ब्लॉकमुळे काही पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही पॅसेंजर गाड्या निर्धारित  स्थानकांपर्यंत धावणार नसल्याची घोषणा सोलापूर मध्य रेल्वे प्रशासनाने केली आहे.

सोलापूर मध्य रेल्वे विभागात सुधारित मशीन लावल्यामुळे हा इंजिनिअरिंग कॉरिडॉरचा ब्लॉक घेतला असल्याची माहिती रेल्वे जनसंपर्क अधिकारी राजेंद्र शर्मा यांनी दिली. या ब्लॉकमुळे गाडी क्र. 5769 (सोलापूर-फलकनुमा पॅसेंजर) व गाडी  क्र. 5134 (रायचूर-विजापूर) पॅसेंजर सोलापूर स्थानकापर्यंत न धावता या गाड्या अक्‍कलकोट स्थानकापासून वळविण्यात आल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही गाड्या गुलबर्गा स्थानकाला जाणार नाहीत.

गाडी क्र. 71415 (पुणे-सोलापूर) पॅसेंजर आपल्या निर्धारित स्थानकापर्यंत न धावता पुणे ते भिगवणपर्यंत धावणार आहे. गाडी क्र. 71414 (सोलापूर-पुणे पॅसेंजर)  आपल्या निर्धारित स्थानकापर्यंत न धावता भिगवण ते पुणे यादरम्यान धावेल. गाडी क्र. 51422 (निजामाबाद-पुणे) पॅसेंजर आपल्या निर्धारित स्थानकापर्यंत न धावता मनमाडपर्यंत धावेल. या ब्लॉक काळात निजामाबाद-पुणे पॅसेंजर गाडी दौंड ते मनमाडदरम्यान धावणार नाही. गाडी क्र. 51421 (पुणे-निजामाबाद पॅसेंजर) आपल्या निर्धारित स्थानकापर्यंत न धावता पुणे ते दौंड  स्थानकापर्यंतच धावणार आहे.

गाडी क्र. 57516 (नांदेड-दौंड पॅसेंजर) गाडी नागरसोल स्टेशनपासून पहाटे 4.14 ला टर्मिनेट करण्यात येईल. ही गाडी रात्री 8.05 वाजता नागरसोल स्टेशनपासून नांदेडकडे धावेल. म्हणजेच गाडी क्र 57516/57515 ही दौंड-नागरसोल-दौंडदरम्यान धावणार नाही. इंजिनिअरिंग कॉरिडॉरसाठी  26 फेब्रुवारीपर्यंत घेण्यात आलेल्या या चाळीस दिवसांच्या ब्लॉकची प्रवाशांनी नोंद घेऊन प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.