Sun, Mar 24, 2019 17:20होमपेज › Solapur › दगडफेक करणार्‍या 42 जणांवर गुन्हे दाखल 

दगडफेक करणार्‍या 42 जणांवर गुन्हे दाखल 

Published On: Jul 31 2018 1:38AM | Last Updated: Jul 30 2018 11:10PMसोलापूर : प्रतिनिधी 

मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा, संभाजी ब्रिगेडसह  इतर मराठा समाज संघटनांनी सोलापुरात सोलापूर बंदची हाक दिली. या हाकेस सर्व समाजाने पाठिंबा देऊन उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळला. 

मात्र शिवाजी चौक, निराळे वस्ती, नवी वेस, जुना पुना नाका याठिकाणी दगडफेक केल्याप्रकरणी पोलिसांनी सौम्य लाटीचार्ज केला. यात काहीजणांनी पोलिस उपायुक्तांच्या वाहनांवर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी जादा पोलिसांची कुमक मागवून घोषणाबाजी करुन रस्त्यात अडथळा निर्माण करणार्‍यास ताब्यात घेण्यास सुरुवात केली. सत्तरफूट चौकातही घोषणाबाजी केल्याप्रकरणी काहीजणांना ताब्यात घेतले. असे एकूण 180 जणांना ताब्यात घेऊन तणाव निवाळल्यानंतर, शांतता प्रस्थापित झाल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. 

यात नगरसेवक आनंद चंदनशिवे, चेतन नरोटे, मराठा क्रांती मोर्चाचे श्रीकांत घाडगे, प्रताप चव्हाण, विजय पुकाळे, मतीन बागवान यासह जवळपास 180 जणांना ताब्यात घेतले. हे सर्वजण फौजदार चावडी पोलिस ठाणे, एमआयडीसी पोलिस ठाणे, जोडभावी पोलिस ठाणे, विजापूर नाका पोलिस ठाणे हद्दीत घोषणाबाजी केली. 

तर शांततेत चालत असलेल्या आंदोलनात दगडफेक केल्याप्रकरणी सिद्धाराम स्वामी, संजय माने, विलास सावंत, सागर गव्हाणे, मारुती मकनापुरे असे 42 जणांवर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांच्या वाहनावर दगडफेक करुन काच फोडल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक देवदत्त गोंडसे यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे. 
सकाळ सहा वाजल्यापासूनच शहरात जवळपास 53 ठिकाणी फिक्स पॉईंट लावून पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. सकाळी पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी स्वत: अनेक ठिकाणी जाऊन बंदोबस्ताची पाहणी केली. नागरिकांना त्रास होणार नाही, यासाठी ते स्वत: लक्ष घालून सूचना करीत होते. सकल मराठा समाजाचे काही मंडळी छत्रपती शिवाजी चौकात येऊन महाराजांना पुष्पहार घालून घोषणाबाजी करुन रस्ता अडवण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिस आयुक्तांनी आपणास सर्व समाजाने पाठिंबा दिला असताना आपण रस्त्यावर येऊन घोषणाबाजी करु नका, असे आवाहन केले. त्यानंतरही घोषणाबाजी करुन काही तरुणांनी हुल्लडबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन सुटका करण्यात आली. 

75 हजारांचे नुकसान 
तीन पोलिस व्हॅनवर दगडफेक केल्याने यात 40 हजारांचे, पुना नाका येथे खासगी कारवर केलेल्या दगडफेकीत 15 हजारांचे नुकसान झाले. तसेच शिवाजी चौकातील शीतल हॉटेलवर झालेल्या दगडफेकीत काचा फुटल्याने 20 हजारांचे असे एकूण 75 हजारांचे नुकसान झाल्याचे पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी सांगितले.