Fri, Jul 19, 2019 05:49होमपेज › Solapur › पतसंस्थेच्या अध्यक्षासह बावीस संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा

पतसंस्थेच्या अध्यक्षासह बावीस संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा

Published On: Aug 19 2018 1:34AM | Last Updated: Aug 18 2018 9:07PM
करमाळा : प्रतिनिधी
येथील महात्मा फुले पतसंस्थेत ठेवीदारांनी ठेवलेल्या लाखो रुपयांच्या ठेवींची रक्‍कम परत  देण्यास टाळाटाळ करणार्‍या पतसंस्थेच्या अध्यक्ष, सचिवांसह तब्बल 22 संचालकांवर करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
या संस्थेमध्ये ठेवी ठेवून त्यांच्या ठेवीची रक्‍कम न मिळाल्याने येथील रवींद्र जवाहरलाल संचेती यांनी करमाळा पोलिस ठाण्यामध्ये रितसर फिर्याद नोंदवलेली आहे. या पतसंस्थेकडे 60 लाख 63 हजार 192 रुपयांची ठेव ठेवलेली होती. इतर ठेवीदारांच्याही सन 2010 ते 2016 दरम्यान लाखो रुपयांच्या ठेवी या पतसंस्थेमध्ये ठेवलेल्या आहेत. त्यांची ठेवीवरील मुदत संपलेली असताना वारंवार पतसंस्थेकडे मागणी करूनही ठेवीदारांना 
ठेवीचे पैसे मिळत नसल्यामुळे ठेवीदारांनी सहकारी संस्था करमाळा, जिल्हाधिकारी सोलापूर, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर यांच्याकडे लेखी तक्रारी केलेल्या आहेत. मात्र तक्रारींची दखल न घेता व संस्थेचे चेअरमन यांनी तक्रारदारांना न जुमानता उडवाउडवीची उत्तरे देत होते. त्यामुळे शेवटी रविंद्र संचेती, दत्तात्रय भुजबळ, मोहिते आदी ठेवीदारांनी तहसील कार्यालय करमाळा येथे 15 ऑगस्ट दिनाचे औचित्य साधून ठेवी मिळण्यासाठी आमरण उपोषणाचा इशारा दिलेला होता.
शेवटी करमाळा पोलिसांनी या उपोषणाची दखल घेऊन त्वरित महात्मा फुले समता नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप बलभीम भुजबळ, व्यवस्थापक प्रशांत लक्ष्मण शिंदे यांच्यासह 22 संचालक मंडळाच्या विरोधामध्ये करमाळा पोलिस स्टेशन मध्ये भा.दं.वि. 420, 409, 120 ब अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पी.एस.आय. वाघमारे हे करत आहेत.