Tue, Jul 16, 2019 09:58होमपेज › Solapur › भाजपची विनापरवाना रॅली; 50 जणांवर गुन्हे

भाजपची विनापरवाना रॅली; 50 जणांवर गुन्हे

Published On: Jun 13 2018 1:35AM | Last Updated: Jun 12 2018 9:39PMसोलापूर : प्रतिनिधी

केंद्रातील   भारतीय जनता पक्षाच्या  सरकारला   चार   वर्षे    पूर्ण   झाल्यानिमित्त   भाजपच्यावतीने काढण्यात आलेल्या मोटारसायकल रॅलीस पोलिस आयुक्‍तालयाच्यावतीने परवानगी नाकारण्यात आली होती. तरीदेखील पक्षाने मोटारसायकल रॅली काढल्याप्रकरणी भाजपच्या शहराध्यक्षांसह 50 जणांविरुध्द जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तथापि, या रॅलीत सहकारमंत्री सुभाष देशमुख व महापौर शोभा बनशेट्टी हेदेखील सहभागी झाले होते. त्यांना मात्र पोलिसांनी का वगळले?, असा प्रश्‍न आता उपस्थित झाला आहे. 

पोलिस हवालदार अमित शिरीष रावडे यांच्या फिर्यादीवरुन भाजपचे शहराध्यक्ष अशोक निंबर्गी (रा. मराठा वस्ती, सोलापूर), नगरसेवक नागेश वल्याळ (रा. भवानी पेठ, सोलापूर), राज्य शिखर बँकेचे तज्ज्ञ संचालक अविनाश महागावकर (रा. विद्यानगर, पाथरूट चौक, सोलापूर), दत्तात्रय गणपा (रा. सोलापूर), भाजयु मोर्चाच्या शहराध्यक्षा वृषाली चालुक्य (रा. इंदिरानगर, सोलापूर), नगरसेविका संगीता जाधव (रा. जुळे सोलापूर), संतोष भोसले (रा. विकासनगर, सोलापूर), अशोक साळुंखे (रा. सोलापूर) यांच्यासह 40 ते 50 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपच्यावतीने सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास तुळजापूर वेस येथील बलिदान चौकातून ही 40 ते 50  मोटारसायकलींवरून रॅली काढण्यात आली होती. ही  रॅली कुंभार वेस, कोंतम चौक, माणिक चौक मार्गे होटगी रोड, विकासनगरपर्यंत काढण्यात आली होती.  रॅलीमध्ये  राज्याचे  सहकारमंत्री सुभाष  देशमुख, महापौर  शोभा  बनशेट्टी हेदेखील मोटारसायकलवरुन सहभागी झाले होते. पोलिस आयुक्‍तालयाच्या हद्दीत महाराष्ट्र पोलिस अधिनियम 37(3) चा बंदी आदेश लागू आहे. त्यामुळे पोलिस उपायुक्‍त (परिमंडळ) यांनी त्यांच्याकडील जा. क्र. पोउपआ परिमंडळ/पर/नाकारले/2367/2018 दि. 08/06/2018 अन्वये मोटारसायकल रॅलीस परवानगी नाकारली होती. तरीही भाजपच्या पदाधिकार्‍यांनी मोटारसायकल रॅली काढून पोलिसांच्या आदेशाचा भंग केला म्हणून जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस  उपनिरीक्षक  सानप तपास करीत आहेत.

गुन्ह्यातून सहकारमंत्री, महापौरांचे नाव वगळले का?

भाजपच्यावतीने सोमवारी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये राज्याचे सहकारमंत्री, महापौर हेदेखील मोटारसायकलवरुन सहभागी झाले होते. या रॅलीच्या  फोटोसह बातम्या सर्वच वृत्तपत्रांमधून मंगळवारी प्रसिध्द झाल्या आहेत. रॅली विनापरवाना असल्याने याबाबत पोलिसांनी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. परंतु आरोपींमध्ये भाजप शहराध्यक्ष, नगरसेवक, राज्य शिखर बँकेचे तज्ज्ञ संचालक यांची नावे नोंदविली गेली असून इतर 40 ते 50 जणांचा समावेश आहे. परंतु यामधून सहकारमंत्री, महापौर यांची नावे वगळली आहेत. याबाबत जोडभावी पेठ पोलिस ठाण्याच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता रॅलीचे जे संयोजक असतात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे सांगितले. त्यामुळे एका मोटारसायकल रॅलीचे 50 जण संयोजक असू शकतात का?, हा प्रश्‍न उपस्थित होतो. एकंदरीत पोलिसांचे कामकाज हे कसे दुटप्पीपणाचे आहे, हे यावरून दिसून येते.