Wed, Mar 27, 2019 06:00होमपेज › Solapur › कार्ड क्‍लोनिंग; सोलापुरातही अनेकांना लागतोय चुना!

कार्ड क्‍लोनिंग; सोलापुरातही अनेकांना लागतोय चुना!

Published On: Jul 05 2018 1:42AM | Last Updated: Jul 04 2018 8:33PMसोलापूर : रामकृष्ण लांबतुरे 

धावपळीच्या युगात  पैसा घेऊन फिरणे धोक्याचे ठरते. पैसे चोरी, हरवले जाऊ  शकतात म्हणून बरेचजण एटीएम घेऊनच फिरतात. मात्र एटीएम कार्डाचा व्यवहारात सावधपणे वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण सायबर गुन्ह्यांचे प्रमाण सध्या गतीने वाढत आहेत.

नुकतेच मुंबईच्या खेरवाडी पोलिसांनी एटीएम कार्ड क्‍लोनिंगद्वारे  कोट्यवधींची फसवणूक करणारी टोळी गजाआड करुन पाचजणांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडे बोगस, बनावट एटीएम कार्डासह इतर मुद्देमाल मिळून आला आहे. सोलापूर शहरातही बनावट एटीएमद्वारे फसवणूक झाल्याचे  अनेक गुन्हे  दाखल आहेत. ऑनलाईन फसवणुकीत गुन्हेगार हे पांढरपेशी असतात. शहरातील काही कॅफे, हॉटेल, रेस्टॉरंट, कपड्यांची दुकाने आणि विशेष म्हणजे पेट्रोल पंपावर, त्यातही हायवेवरील पंपावर केलेले व्यवहार अत्यंत धोक्याचे ठरत आहे. 

कार्ड क्‍लोनिंगद्वारे ग्राहकांच्या डेबीट आणि क्रेडीट कार्डचा डाटा चोरी करुन बोगस काडार्र्वरुन कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली जात आहे. हे लोक एक पाऊल पुढे टाकून कॅफे, हॉटेल, रेस्टॉरंट, मोठमोठाले मॉल, पेट्रोल पंप येथे काम करणार्‍या कर्मचार्‍यांना हाताशी धरून तिथे येणार्‍या ग्राहकांचे क्रेडीट आणि डेबीट कार्ड पोर्टेबल मॅग्नेटिक स्ट्रीप कार्ड रिडरच्या मदतीने डाटा चोरी करतात. 

त्याबदल्यात त्या कर्मचार्‍यांना काही रकमेचे कमिशनचे अमिष दाखवले जात असल्याने तेही अशाप्रकाराला बळी पडतात. हे गुन्हेगार पोर्टेबल मॅग्नेटिक स्ट्रीप कार्ड रिडर, डाटा रिडर, रायटर मशीन, लॅपटॉपचा वापर करुन विविध बँकेचे बनावट डेबीट, क्रेडीट कार्ड तयार करतात. या क्‍लोन कार्डपासून अनेकजण अनभिज्ञ आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपण एटीएमचा व्यवहार कोठे करतोय, जागा सुरक्षित आहे का, वापर किती केला जातो याचा विचार करुनच त्याठिकाणी कार्डचा वापर करणे शहाणपणाचे ठरणार आहे. काही बँका प्रत्येक एटीएम व्यवहारावर रिफंड रिपे म्हणून काही रक्‍कम ग्राहकांच्या खात्यात टाकतात. याला बळी पडून अनेकजण महामार्गावरील निमर्नुष्य असलेल्या पेट्रोल पंपावर एटीएमकार्डचा वापर करुन इंधन भरतात. याचठिकाणी कार्ड क्‍लोनिंग होण्याची दाट शक्यता असते. फोनद्वारे ओटीपी क्रमांक मागून, कार्डची वैधता, तारीख, इतर माहिती विचारून, चेहरा ओळखा, तुम्ही भाग्यवान विजेता ठरलात, आधी खात्यात पैसे भरा, अशा प्रकारचे ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार चालूच आहेत. हे प्रकारही बँकेच्या सुटीच्या कालावधीत, शनिवार, रविवार, इतर हॉलिडेची सुटी पाहून केले जात आहेत. कारण फसवणूक झालेल्या माणसाला  त्वरित बँकेत जाता येऊ नये, स्टेटमेंट घेता येऊ नये तसेच सायबर क्राईमचीही मदत मिळणे मुश्किल असते.