Sun, May 26, 2019 10:37होमपेज › Solapur › कारचालकाचा खून करून मृतदेह फेकला डॅममध्ये

कारचालकाचा खून करून मृतदेह फेकला डॅममध्ये

Published On: Jun 27 2018 1:22AM | Last Updated: Jun 26 2018 11:20PMनळदुर्ग : शिवाजी नाईक 

आलियाबाद (ता. तुळजापूर) येथील बेपत्ता कारचालकाचा अखेर पोलिसांनी दोन आठवड्यात तपास करुन छडा लावला आहे. दोघा आरोपींनी तरुण कारचालकाचे अपहरण करुन पैश्याच्या कारणावरुन त्याचा चाकूने भोसकून खून करुन पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह कर्नाटक राज्यातील करंजा (जि. बिदर) डॅममध्ये फेकून दिल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे.

अजय व्यंकट राठोड (वय 24, रा. आलियाबाद, ता. तुळजापूर) असे खून झालेल्या कारचालकाचे नाव आहे. तर निसार मोदीन जमादार, सलीम ईलाही नदाफ (दोघे रा. सिंदगाव, ता. तुळजापूर) अशी संशयीत आरोपींची नावे आहेत.

यातील अजय राठोड हा तरुण आपल्या स्विफ्ट कारमधून (एमएच 24 एयू 1507) पुण्याला भाडे घेऊन चाललो असे घरी सांगून 22 मे रोजी घरातून गेला होता. त्याला जाऊन 19 दिवस झाले तरी तो परत आला नाही, तसेच संपर्कही होत नसल्याने त्याचा भाऊ अविनाश व्यंकट राठोड याने नळदुर्ग पोलिस ठाण्यात 1 जून रोजी भावाचे अपहरण झाल्याची तक्रार दिली होती. दरम्यान, 29 मे रोजी सोलापूर येथील घरकुल परिसरात अक्कलकोट रस्त्यावर सोलापूर पोलिसांना त्याची स्विफ्ट कार बेवारस अवस्थेत मिळून आली.

नळदुर्ग पोलिसांनी ती कार ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणून लावली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून सिंदगाव (ता. तुळजापूर) येथून निसार मोदीन जमादार या तरुणाला 6 जून रोजी अटक केली. तर 13 जून रोजी सलीम ईलाही नदाफ या तरुणास अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली.    पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, पोलिस उपनिरीक्षक संग्राम जाधव, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक शेख दगडू यांच्यासह पाच पोलिसपथकांनी सोलापूरसह कर्नाटक राज्यातील अनेक ठिकाणी तपास केला. त्यामध्ये दहशतवाद विरोधी पथक, आपत्कालीन व्यवस्थापन पथक उस्मानाबाद हे सहभागी झाले होते.

पोलिस तपासात मयत अजय राठोड व आरोपी यांची पूर्वीपासून ओळख होती, पैश्याच्या कारणावरुन आरोपींनी राठोड याचे अपहरण करुन त्याला बिदर जिल्ह्यातील करंजा डॅम येथे घेऊन गेले. त्याठिकाणी चाकुने राठोड याला जीवे मारुन त्याचा मृतदेह डॅममध्ये फेकून दिला. मात्र डॅमचे मोठे पात्र असल्याने पोलिस पथकाला राठोड याचा मृतदेह व चाकू हाती लागला नाही. दरम्यान, आरोपी निसार जमादार व सलीम नदाफ यांची 22 जून रोजी जेलमध्ये रवानगी करण्यात आल्याची माहिती दै.पुढारीशी बोलताना सहाय्यक पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी सांगितली.