Thu, Apr 25, 2019 22:15होमपेज › Solapur › रुग्णवाहिकेच्या मद्यधुंद चालकाची नगरसेवकाच्या गाडीला धडक

रुग्णवाहिकेच्या मद्यधुंद चालकाची नगरसेवकाच्या गाडीला धडक

Published On: Feb 06 2018 10:57PM | Last Updated: Feb 06 2018 9:20PMसोलापूर : प्रतिनिधी

अपघातातील एखाद्या जखमीचा जीव वाचविण्यासाठी रुग्णवाहिकेची भूमिका फार मोलाची ठरते. परंतु, मंगळवारी सकाळी जीव वाचविणारी हीच रुग्णवाहिका काही जणांचा जीव घेणारी ठरली असती. परंतु, यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. केवळ थांबलेल्या स्कॉर्पिओ गाडीचे नुकसान झाले. ही थरारक घटना मंगळवारी सकाळी बुधवार पेठेत घडली. रुग्णवाहिकेच्या मद्यधुंद अवस्थेतील चालकाने रुग्णवाहिका बेफाम चालवून थांबलेल्या स्कॉर्पिओ गाडीला जोरदार धडक दिली. यावेळी नागरिकांनी रुग्णवाहिकेतील मद्यधुंद अवस्थेतील दोघां चालकांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

त्याचे झाले असे की, मंगळवारी सकाळी बुधवार पेठेतील बसपाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांची एमएच 13 बीएन 777 ही स्कॉर्पिओ गाडी त्यांच्या कार्यालयासमोर थांबली होती. यावेळी  गाडीमध्ये  कुणीही नव्हते. सकाळी सव्वाआठच्या सुमारास दमाणी शाळेसमोरील रस्त्यावरुन एमएच 14 सीएल 0632 क्रमांकाची 108 नंबरची रुग्णवाहिका भरधाव चंदनशिवे यांच्या कार्यालयाकडे आली आणि रुग्णवाहिकेच्या चालकाने स्कॉर्पिओला जोरदार धडक देत तशीच पुढे निघाली आणि थांबली. मंगळवारी या परिसरामध्ये पिण्याचे पाणी आल्याने रस्त्यावर नागरिक व महिला पाणी भरत होते. परंतु, ही घटना होताना रस्त्यावर कुणीही नसल्याने यावेळी कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही. रुग्णवाहिकेची गाडीला जोरदार धडक बसल्याने मोठा आवाज झाला. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी गर्दी केली  आणि थांबलेल्या रुग्णवाहिकेच्या  चालकाला पकडले. त्यावेळी  रुग्णवाहिका विनायक  चिंचिणेकर (रा. बुधवार पेठ, सोलापूर) हा रुग्णवाहिका चालवित असल्याचे दिसून आले व त्याच्या शेजारी महेश झिंजुडे (रा. निराळे वस्ती, सोलापूर) हा दारुच्या नशेत झोपलेला असल्याचे दिसून आले. 

यावेळी नागरिकांनी दोघांना पकडून त्यांच्याकडे चौकशी केली असता महेश झिंजुडे हा रुग्णवाहिकेचा चालक असून विनायक  हा  त्याचा  मित्र आहे. विनायकला त्याच्या घराजवळ सोडण्यासाठी तो स्वतः रुग्णवाहिका चालवित अतिशय रुंद असलेल्या रस्त्यावरुन गाडी चालवित आला  होता. याबाबत फौजदार चावडी  पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.