Wed, Mar 20, 2019 23:26होमपेज › Solapur › अन्यथा मनपा बरखास्त करू

अन्यथा मनपा बरखास्त करू

Published On: Jan 12 2018 1:57AM | Last Updated: Jan 11 2018 11:10PM

बुकमार्क करा
 सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर महापालिकेतील पक्षांतर्गत गटबाजीच्या राजकारणामुळे भाजपची होत असलेली बदनामी आता तरी थांबवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेमुळे तुम्ही निवडून आलात हे लक्षात घ्या. यापुढे गट-तट विसरून एकदिलाने कारभार करा, अन्यथा तीन महिन्यांत मनपा बरखास्त करू, असा गर्भित इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मध्यरात्री सोलापूर मनपाच्या पदाधिकारी व गटबाजी करणार्‍या नगरसेवकांना दिला.

दहा महिन्यांपूर्वी मनपात सत्तेवर आलेल्या भाजपला पालकमंत्री विजयकुमार देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख या दोन गटांच्या एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या राजकारणामुळे पुरते ग्रासले आहे. या गटातटांचे राजकारण टोकाला गेल्याने भाजपची अब्रू अनेकवेळा वेशीला टांगल्याचे सर्वश्रूत आहे. यामुळे भाजपची मोठी बदनामी होऊन जनमानसांतील प्रतिमा मलीन झाली. काही महिन्यांपूर्वी गाळेभाडेवाढ विषयाच्या मुद्द्यावरून  दोन गटांनी वेगवेगळी भूमिका घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही गटांना सुनावले होते. मात्र, या दोन गटांच्या वागण्यात तसूभरही फरक पडला नाही.  मनपा सभागृह नेते सुरेश पाटील गेल्या महिन्यापासून आजारी पडल्यामुळे हे पद कोणी घ्यायचे, यावरून दोन्ही गटांत वाद निर्माण झाला होता. या कारणाच्या निमित्ताने सहकारमंत्री गटावर मनपा सभेत कुरघोडी करण्याचा प्रयत्न पालकमंत्री गटाने केला खरा; पण सहकारमंत्री गटाने शिवसेना, एमआयएमची मदत घेऊन मोठ्या खुबीने ही खेळी उधळून लावली. या घटनेमुळे पुन्हा एकदा भाजपच्या अब्रूचे धिंडवडे निघाल्यावर प्रदेश भाजप व मुख्यंमत्र्यांनी याची गंभीर दखल घेतली. 

मंगळवारी स्थानिक दोन्ही मंत्री, शहराध्यक्ष, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती यांना मुंबईला येण्याचे फर्मान पक्षाने काढल्यानंतर बुधवारी सकाळी हे सर्वजण मुंबईला पोहोचले. यानंतर अचानक भाजपच्या सर्व नगरसेवकांना देखील तातडीने मुंबईला येण्याचे आदेश पक्षाने दिले. यामुळे मिळेल त्या वाहनाने नगरसेवकांनी बुधवारी रात्री मुंबई गाठली.

मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी रात्री सव्वाअकराच्या सुमारास बैठकीला सुरुवात झाली. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, महापौर शोभा बनशेट्टी, उपमहापौर शशिकला बत्तुल, स्थायी समिती सभापती संजय कोळी, राष्ट्रीय भाजपचे संघटक व्ही. सतीश, प्रदेश भाजपचे संघटक सचिव तथा सोलापूरचे निरीक्षक रवी अनासपुरे, उमा खापरे यांच्यासह दोन्ही गटांचे नगरसेवक यावेळी उपस्थित होते.

तक्रारींचा वाचला पाढा
या बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर दोन्ही गटांच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी एकमेकांविरोधात तक्रारींचा पाढा वाचला. दोन मंत्र्यांसह महापौर, शहराध्यक्षांच्या चुकीच्या वागण्यामुळे पक्षाची बदनामी होत असल्याचा मुद्दा यावेळी अनेकांनी मांडला. गटबाजीच्या राजकारणाचा नाहक फटका भाजपच्या नगरसेवकांना बसत असल्याचा सूरही यावेळी आळविण्यात आला.

कोअर कमिटी नेमण्याचा आदेश 
यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गटबाजीचा प्रकार मला बिलकूल रूचला नाही. यापुढे गटबाजीला पूर्ण विराम देऊन दोन्ही मंत्र्यांनी शहर विकासावर लक्ष केंद्रीत करावे. राज्य सरकारकडून निधी दिला जाईल. विकासाकामी शहराध्यक्षांनी दोन्ही मंत्र्यांना घेऊन कोअर कमिटी स्थापन करावी. जर तीन महिन्यांत मनपाच्या कारभारात     पान 9 
सुधारणा न झाल्यास मनपा बरखास्त करावी लागेल. 1991 ते 1993 या काळात नागपूर मनपा बरखास्त करण्यात आली होती, अशी आठवण करून देत मुख्यमंत्री तुकाराम मुंढे यांच्यासारखे कडक शिस्तीचे अधिकारी सोलापूरला पाठवू या शब्दांत  दोन्ही गटांची कानउघडणी केली.

महापौर-नगरसेविकांचे पतीराज प्रतीक्षागृहात
या बैठकीला अनेक नगरसेविका गेल्या नाहीत, मात्र त्यांचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी त्यांचे पतीराज मुंबईला गेले. बैठकीला केवळ पदाधिकारी व नगरसेवक-नगरसेविकांनाच प्रवेश होता. महापौर शोभा बनशेट्टी यांचे पती श्रीशैल बनशेट्टी यांच्यासह आनंद बिर्रु, राजू पाटील, दत्तू पोसा, राजू काकडे, सुनील मुदगल, प्रमोद हुच्चे, व्यंकटेश कोंडी, श्रीनिवास पुरूड, समशेर अंबेवाले आदी पतीराजांना प्रतीक्षागृहात थांबावे लागले.

सव्वाएकला संपली बैठक
नगरसेवक बुधवारी दुपारी सोलापूरहून निघाल्याने ते मुंबईला रात्री पोहोचले. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी सव्वाअकराच्या सुमारास बैठकीला सुरुवात झाली. ही बैठक मध्यरात्री सव्वाएकपर्यंत म्हणजे दोन तास चालली. या सर्वांची ‘वर्षा’वर  जेवणाची सोय करण्यात आली होती. बैठक संपल्यावर अनेकांनी लगेचच परतीचा प्रवास सुरू केला. काही जण आपापल्या सोयीने सोलापूरकडे निघाले.

गटाचे नाव पुकारल्यावर एकाचाही हात वर नाही
या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी गटबाजीचा खरपूस समाचार घेताना उपस्थित नगरसेवकांना पालकमंत्री विजयकुमार देशमुख गटाचे नगरसेवक कोण, असा सवाल केला. यावर पालकमंत्री समर्थक एकाही नगरसेवकाने हात वर उचलला नाही. यानंतर मुख्यंमत्र्यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख गटाचे कोण, असे विचारल्यावर एकानेही हात वर करण्याचे धाडस केले नाही. यावर मुख्यमंत्र्यांनी भाजपचे नगरसेवक कोण, असे विचारताच सर्वांनी हात उंचावले. यापुढे गटबाजी खपवून घेतली जाणार नाही. लोकांनी मोठ्या विश्‍वासाने तुम्हाला निवडून दिले. त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करा, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.