होमपेज › Solapur › शांतता सुव्यवस्था बिघडली तर पालकमंत्री, आयुक्त जबाबदार : गाळेधारक 

शांतता सुव्यवस्था बिघडली तर पालकमंत्री, आयुक्त जबाबदार : गाळेधारक 

Published On: Jul 07 2018 8:41PM | Last Updated: Jul 07 2018 8:41PMसोलापूर : प्रतिनिधी

गेल्या चाळीस वर्षांपासून व्यापार करणार्‍या महापलिकेच्या गाळेधारकांना विस्थापित केल्यावर जर भावनेच्या भरात शांतता व सुव्यवस्था बिघडली तर त्याला पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे हेच जबाबदार असणार आहेत. असा इशारा महानगरपालिका गाळेधारक व्यापारी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक मुळीक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

भाड्याने दिलेल्या गाळ्यांची मुदत संपल्याने ते गाळे ई-टेंडरींग पध्दतीने पुन्हा भाड्याने देण्याची तयारी आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी केली. त्यावर गाळेधारक संघर्ष समितीच्या वतीने आज पत्रकार परिषद घेऊन प्रत्योत्तर दिले.

मुळीक म्हणाले की, ‘‘यापूर्वीही महापालिकेचेत तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या काळात गाळेधारकांवर गंडांतर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळी पालकमंत्री देशमुख हे आमच्या बरोबर लढ्यात उतरले होते. त्यांनीच आम्हाला मार्गदर्शन केले. मात्र, आज सत्ता आल्यावर ते आमच्याविरोधात गेले आहेत. आम्ही सर्व व्यापारी मोठ्या आशेने त्यांच्याकडे गेलो मात्र, त्यांनी माझे हात कायद्याने बांधल्याचे सांगत व्यापार्‍यांच्या बाजूने नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे व्यापारीही भविष्यात त्यांच्या बाजूने राहणार नाहीत हे त्यांनी लक्षात घ्यावे.’’

आयुक्तांनी नव्या लोकांना, सुशिक्षत बेरोजगारांना या गाळ्यात संधी  देण्याचे सांगत लोकांची सिंपती मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्याबाबत त्यांनी जर त्यांना नव्या लोकांना संधी द्यायचीच असेल तर एक-दोन रुपयांच्या नाममात्र पैशात हजारो स्क्वेअर फुट जागा महापालिकेने दिली आहे. त्याची मुदत संपून 15-15 वर्ष झाली आहेत. त्या त्यांनी ताब्यात घ्याव्यात आणि तिथे नवे कॉम्प्लेक्स बांधून तिथे नव्या लोकांना गाळे भाड्याने द्यावेत असेही त्यांनी सांगितले. यावेळी केतन शहा, चेंबर उपाध्यक्ष बसरवाज दुलंगे, पशुपती माशाळ, दीपक मुनोत, देवाभाऊ गायकवाड, खुशाल देढीया, मोहन बारड, गुलाब बारड, माणिक गोयक, विजय पुकाळे आदी उपस्थित होते.