Thu, Jul 18, 2019 00:51होमपेज › Solapur › अघोषित संपाने प्रवाशांची तारांबळ!

अघोषित संपाने प्रवाशांची तारांबळ!

Published On: Jun 09 2018 1:37AM | Last Updated: Jun 08 2018 11:49PMसोलापूर : प्रतिनिधी

राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचार्‍यांनी अचानक राज्यभरात पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांची एकच तारांबळ उडाली. त्याचा फटका सोलापूरसह जिल्हाभरातील प्रवाशांना बसला. सोलापूर जिल्ह्यात या संपाला संमिश्र प्रतिसाद लाभला असला, तरी उस्मानाबाद व बीडमध्ये संपाची तीव्रता जास्त होती. बेकायदेशीरपणे संपावर गेलेल्या कर्मचार्‍यांवर महामंडळाच्या प्रशासकीय अधिकार्‍यांनी कारवाईदेखील केली.

संपाची तीव्रता सोलापूर शहरातील बसस्थानकात कमी होती.उस्मानाबादमध्ये पोलिसांनी एसटी कर्मचार्‍यांना ताब्यात घेतले होते. तर बीडमधील आंबेजोगाईमध्ये वाहतूक नियंत्रकाने संपात सहभाग घेतल्याने त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. गुरुवारी मध्यरात्रीपासून हा अघोषित संप पुकारण्यात आला आहे. 13 संघटनांच्या समितीमध्ये अधिकृतपणे कोणताही निर्णय झाला नाही  तरी कर्मचार्‍यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेजवरून संपाची हाक देण्यात आली. या संपावर मात करण्यासाठी प्रशासनाच्या अधिकार्‍यांना डेपो न सोडून जाण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. एसटी कर्मचार्‍यांमधील शिवसेनाप्रणित कामगार सेनेने यामध्ये सहभाग न घेता काम करण्याचा निर्णय घेतला होता. शहरातील  बसस्थानकात शुक्रवारी सकाळी प्रवासी मोठ्या संख्येने आले होते. विभागीय नियंत्रक व विभागीय वाहतूक अधिकार्‍यांनी जादा बसेस उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला होता. बार्शी, पंढरपूर, मंगळवेढा, करमाळा, सांगोला आदी बसस्थानकांत शुकशुकाट होता. ग्रामीण भागातील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

उस्मानाबादमधील एसटी संपात  सहभाग घेतलेल्या कर्मचार्‍यांना ताब्यात घेण्यात आले होते. गोंधळ होऊ नये किंवा कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

अंबाजोगाई डेपोचे वाहतूक नियंत्रक व्ही.पी. चाटे यांना निलंबित करण्यात आले असून  चाटे यांच्याकडे कंडक्टर यांना लागणार्‍या तिकीट वेंडिंग मशिन्स देण्याची जबाबदारी होती आणि ते मशिन्स वाटप न करता चाटे संपात सहभागी झाले म्हणून त्यांना निलंबित करण्यात आले असल्याचे एसटी प्रशासनाने म्हटले आहे. सोलापुरात सायंकाळपर्यंत कारवाई करण्याचे आदेश प्राप्त झाले नसल्याची माहिती विभागीय निमंत्रक रमाकांत गायकवाड यांनी दिली.