Fri, Apr 26, 2019 16:13होमपेज › Solapur › एसटी कर्मचार्‍यांचा संप; प्रवाशांचे हाल

एसटी कर्मचार्‍यांचा संप; प्रवाशांचे हाल

Published On: Jun 09 2018 1:37AM | Last Updated: Jun 08 2018 11:27PMपंढरपूर : प्रतिनिधी

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी विविध मागण्यांसाठी अचानक संप पुकारल्याने शुक्रवारी सकाळपासून ग्रामीण व लांबपल्ल्यांच्या  एसटी बसेस धावल्या नाहीत. अचानक संप पुकारल्याचा फटका मात्र भाविक व प्रवाशांना बसला आहे. अधिक मास सुरू असल्याने याचा जास्त फटका भाविकांना बसला असून पंढरपूर आगारातून एकही बस बाहेर गेली नाही. त्यामुळे किमान 15 लाख रुपये आर्थिक उत्पन्नाचा फटका बसला आहे.

सातवा वेतन आयोग, सात टक्के महागाई भत्ता, मुक्काम भत्त्यात वाढ आदी  मागण्या आहेत. या संपात पंढरपूर आगारातील चालक व वाहक सहभागी झाले आहेत. आज सकाळपासून एकही बस सुटली नाही. त्यामुळे बसस्थानकावर आलेले नोकरदार, कामगार, भाविक या प्रवाशांना मन:स्ताप सहन करावा लागला. आगारातील चालक व वाहक आगारात उपस्थित होते. मात्र त्यांनी कामावर जाण्यास ठाम नकार दिल्यामुळे बसेस आगारात जागेवर उभ्या आहेत. पंढरपूर येथील जुन्या व नवीन आगारात 84 बसेस आहेत. यापैकी जुन्या आगारातून ग्रामीण भागासाठी 35 बसेस दररोज धावतात.  मात्र शुक्रवारी कर्मचार्‍यांनी अचानक संप पुकारल्याने सर्वच्या सर्व बसेस जागेवरून हलल्या नाहीत. 

अंदाजे 15 लाख रुपयांचे एका दिवसाचे आर्थिक नुकसान झाले आहे. पंढरीत सध्या अधिक मास सुरू असल्यामुळे दररोज हजारो भाविक दाखल होते. त्यांचे अतोनात हाल झाल्याचे दिसून आले.
अनेक प्रवाशांनी खासगी वाहनांव्दारे प्रवास करणे पसंत केले. अनेक प्रवासी रेल्वेकडे वळले. दुपारी आगार व्यवस्थापनाने पोलिस बंदोबस्तात बसेस सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यास चालक व वाहकांनी प्रतिसाद दिला नसल्यामुळे संप यशस्वी झाल्याचे चित्र दिसून येत होते.