Sat, Nov 17, 2018 18:30



होमपेज › Solapur › बडतर्फी मागे; एस.टी.त पुन्हा ‘प्रोबेशन’!

बडतर्फी मागे; एस.टी.त पुन्हा ‘प्रोबेशन’!

Published On: Jun 26 2018 1:16AM | Last Updated: Jun 25 2018 11:14PM



सोलापूर : प्रतिनिधी

एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी 8 व 9 जून रोजी अघोषित संपात सहभाग घेतला होता. त्यामुळे महामंडळाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी राज्यासह सोलापूर विभागातील 1 हजार 148 एसटी कर्मचार्‍यांची सेवासमाप्ती केली होती. सोमवारी मुंबई येथे झालेल्या बैठकीत सेवासमाप्तीचा आदेश मागे घेऊन सर्व कर्मचार्‍यांना 1 जुलैपासून नव्याने नियुक्त करून घ्यावे, असे आदेश बजावण्यात आले आहेत. 
त्याचा प्रोबेशन काळातील कर्मचार्‍यांना चांगलाच फटका बसला असून बडतर्फी रद्द झाली असली, तरी 1 जुलैपासून त्यांचा नव्याने प्रोबेशन कालावधी सुरू होणार आहे. त्यामुळे त्यांची सेवाज्येष्ठता आपोआप संपुष्टात आली आहे.  

एसटीच्या कर्मचार्‍यांनी 8 व 9 जून रोजी वेतनवाढीसाठी  राज्यभर अघोषित संप पुकारला होता. अचानक झालेल्या या संपामुळे प्रवाशांची एकच तारांबळ उडाली होती. संपामुळे परिवहनमंत्री दिवाकर रावते, व्यवस्थापकीय संचालक व एसटी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांच्यामध्ये बैठक घेऊन वेतनवाढीची घोषणा झाली होती. सोलापूर विभागात संपात सहभाग घेणार्‍या बार्शी आगार व सोलापूर आगारामधील  यांत्रिक विभागात काम करणार्‍या सहायक (कनिष्ठ) एसटी कर्मचार्‍यांची सेवासमाप्ती केली गेली होती. यामध्ये दिलीप साळुंखे (सहाय्यक, सोलापूर आगार), परमेश्‍वर भालेराव (सहाय्यक, सोलापूर आगार), राकेश कुंभारे (सहाय्यक, सोलापूर आगार), प्रवीण भारत गायकवाड (सहाय्यक, बार्शी आगार), सिध्देश्‍वर लक्ष्मण जाधव (सहाय्यक, बार्शी आगार), आकाश चंद्रसेन जगताप (बार्शी आगार) यांची सेवासमाप्त केली गेली होती. सोलापूर विभागातील सहा, तर लातूर आगारातील 44 कर्मचार्‍यांचा समावेश होता. उस्मानाबाद आगारातील 19 कर्मचारीदेखील बडतर्फ करण्यात आले होते.
या संपाचा अहवाल मागवून व्यवस्थापकीय संचालकांनी राज्यभरातील 1148 एसटी कर्मचार्‍यांची  सेवा समाप्त केली होती व 200 कर्मचार्‍यांना निलंबित केले  होते. त्याविरोधात एसटी कर्मचारी  संघटना एल्गार पुकारण्याच्या भूमिकेत होत्या. तथापि, परिवहनमंत्र्यांच्या पुढाकारातून महामंडळ व कामगार संघटना यांच्यात झालेल्या चर्चेनंतर बडतर्फीचा आदेश मागे घेण्यात आला असून सर्व कर्मचार्‍यांना आता नव्याने नियुक्ती देण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली  आहे. सोमवारी दुपारी मुंबई येथे एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक माधव कांबळे व कर्मचारी संघटनेचे संदीप शिंदे, हणुमंत ताटे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली होती.