Thu, Sep 19, 2019 03:27होमपेज › Solapur › साखरपुड्यासाठी जात असताना पंढरपूरजवळ अपघात, 25 जखमी

पंढरपूरजवळ खासगी बस पलटी, 25 जखमी

Published On: May 26 2019 7:37PM | Last Updated: May 26 2019 7:37PM
पंढरपूर : प्रतिनिधी

साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी पंढरपूरहून अहमदनगरकडे जाणार्‍या खासगी लक्झरी बसने समोरुन येणार्‍या टमटमला रस्ता देण्याच्या प्रयत्नात चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस रस्त्यावरुन खाली जात पलटी झाली. या घटनेत बसमधील 25 जण गंभीर जखमी झाले असल्याची घटना रविवारी दुपारी 2.30च्या दरम्यान घडली आहे. 

याबाबत तालूका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पंढरपूर येथील सागर गवळी यांचा केडगाव (जि. अहमदनगर) येथे साखरपुड्याचा कार्यक्रम असल्याने या कार्यक्रमाला सागर गवळी यांचे नातेवाईक खासगी बस क्रमांक ( एम.एच. 13, सी.यु. 1636) ने रविवारी दुपारी पंढरपूर येथून बसने अहमदनगरकडे जात होते. यावेळी भटुंबरे (ता.पंढरपूर) हद्दीत बस आल्यानंतर रस्त्यावरुन समोरुन येणार्‍या टमटमला रस्ता देण्याच्या प्रयत्नात बस चालकाचा बसवरील ताबा सुटला. बस थेट रस्त्यावरुन खाली जात पलटी झाली. या बसमधील 25 जण गंभीर जखमी झाले आहेत. या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम चालू असल्याने रस्त्याची उंची वाढवण्यात आलेली आहे. त्यामूळे बस रस्त्यावरुन खाली जात विद्युत खांबाला धडकून पलटी झाली आहे. अपघातानंतर बसचालक पळून गेला आहे.

या अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी घटनास्थळाला भेट देवून अपघातातील जखमींना पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले. यातील 9 जणांना उपचार करुन पुढील उपचाराकरीता सोलापूर येथील सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात साडेतीन वर्षाचे बालक जखमी झालेले आहे.

सिद्धेश्वर शंकर मिसाळ(70), माणिक दत्तू शहापूरकर (40), गौरव श्रीमंत गवळी(20), गणेश विष्णू मिसाळ(34), सविता रमेश मिसाळ(40), महादेवी सुर्यकांत मिसाळ(40), प्रभाकर मयाजी मिसाळ(50), हिराबाई गंगाराम पमुडवाले(20), बाबुराव दत्तू  मिसाळ(50), सुनिता बाबुराव मिसाळ(40), कृष्णा राम मिसाळ(3 वर्ष 5 महिने), सुवर्णा राम मिसाळ(31), बाळाबाई रामचंद्र भागानगरे (60), रक्षिता राजू तिळसकर (10), सुरेखा गवळी (45), ज्योती सोमनाथ उच्चे (20), माऊली रमेश मिसाळ (25), अक्षय सुरेश गवळी(22), सतीश भीमाशंकर गवळी (32), बाबु भिमा मिसाळ(70), वर्षा किरण गवळी (24), नागनाथ नायकू (54), सुवर्णा भागवत नायकू(45), सुरज सुभाष मिसाळ(30), गणेश दत्तात्रय गवळी(34), सरीता ज्ञानेश्वर नायकू (30) अशी जखमींची नावे आहेत. यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून यातील सिद्धेश्वर शंकर मिसाळ, गौरव गवळी, महादेवी मिसाळ, हिराबाई पमुडवाले, रक्षिता तिळसकर, ज्योती उच्चे, माऊली मिसाळ, सतीश गवळी, सारीका नायकु या 9 जणांना सोलापूर येथे उपचारा करीता दाखल करण्यात आले आहे.  बस चालकाविरोधात तालूका पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते. अधिक तपास पोलिस करत आहेत.