Wed, Jul 17, 2019 20:07होमपेज › Solapur › विजेचा धक्‍का लागून बालकाचा मृत्यू

विजेचा धक्‍का लागून बालकाचा मृत्यू

Published On: Dec 01 2017 11:17PM | Last Updated: Dec 01 2017 10:54PM

बुकमार्क करा

उमरगा : प्रतिनिधी

पालिकेच्या सार्वजनिक शौचालयात शौचास गेलेल्या एका शाळकरी बालकास विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शहरातील महादेव गल्ली कोरेगाव रस्त्यालगत असलेल्या सार्वजनिक शौचालयात घडली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नगरपालिकेच्या वतीने शहरात सात ते आठ ठिकाणी सार्वजनिक शौचालयाची उभारणी करण्यात आली असून त्यापैकी शहरातील महादेव गल्ली परिसरात कोरेगाव रस्त्यालगत असलेल्या सार्वजनिक शौचालयात सायंकाळी साडेसहाच्या सुमारास संभाजी देवीदास सुरवसे (वय 9,रा. महादेव गल्ली, उमरगा) हा मित्रासह शौचास गेला होता. शौचालयासमोर असलेल्या आडोसा भिंतीला लावण्यात आलेल्या विद्युत ट्युबलाईटचा विद्युत प्रवाह शौचालयाच्या तुटलेल्या लोखंडी दरवाज्यात उतरल्याने संभाजीला विजेचा जोरदार धक्‍का लागला.

ते पाहून त्याच्या मित्राने घाबरून पळत बाहेर येऊन आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी आले.एकाने विद्युत प्रवाह बंद करून जखमी अवस्थेत संभाजीला शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले असता  डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

याची माहिती पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर तत्काळ सहायक पोलिस निरीक्षक बी.बी. वडदे, सुशीला कोल्हे, पोलिस उपनिरीक्षक दिनेश जाधव आदींनी घटनास्थळी येऊन पाहणी केली व पंचनामा केला. शहरातील जिजामाता शाळेत दुसरीच्या वर्गात शिकणार्‍या नऊ वर्षीय संभाजी सुरवसे याचा विजेचा धक्‍का लागून मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्‍त केली जात असून पालिकेच्या ढिसाळ कारभाराबाबत नागरिकांतून संताप व्यक्‍त केला जात आहे.