Fri, Mar 22, 2019 01:42
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › बोरामणी विमातळाचे काम सुरू करा : सुशीलकुमार शिंदे

बोरामणी विमातळाचे काम सुरू करा : सुशीलकुमार शिंदे

Published On: Dec 16 2017 1:50AM | Last Updated: Dec 15 2017 9:53PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापुरात बोरामणी येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून काम सुरू करण्याबाबत आठवण करून दिली आहे, अशी माहिती काँग्रेसचे हिमाचल प्रदेशचे प्रभारी तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली. हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीत आम्ही  चांगलीच  टक्‍कर दिलेली असून,  हिमाचलची  जनता  कधीही दुसर्‍या टर्ममध्ये  एकाच  पक्षाला  सत्ता देत नाही. ही वस्तुस्थिती असली तरी आम्ही निवडणूक चांगल्या पद्धतीने लढविली आहे. 18 डिसेंबर रोजी होणार्‍या मतमोजणीची आम्हाला प्रतीक्षा असून, काँग्रेसची सत्ता नक्‍की येईल. सध्या दाखविण्यात  येत असलेले एक्झिट पोल हे मतमोजणीपर्यंत एन्जॉय करावेत, असे मत शिंदे यांनी व्यक्‍त केले.

काँग्रेस भवन येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ते पत्रकारांंशी बोलत होते.
शिंदे यांनी निवडणुकीतील एक्झिट पोल हे खरे ठरत नसल्याचे सांगितले. सोलापुरात बोरामणी येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत जागा संपादन पूर्ण झाले असून, वॉलकंम्पौड बांधण्यात आले आहे. या ठिकाणचे काम विमानतळ विकास प्राधिकरण व महाराष्ट्र शासन यांच्या वतीने करण्यात येणार असून, हे काम आता पुढे रेटायलादेखील हे शासन तयार नाही. सोलापूर हे शैक्षणिक, वैद्यकीयद‍ृष्ट्या हब असून, बोरामणी विमानतळाचा यासाठी फायदा होणार आहे. 

सोलापूर व आजूबाजूचा शेतीमाल, फळफळावळ एक्स्पोर्ट करण्यासाठीही बोरामणी विमानतळ उपयुक्‍त होणार आहे.  होटगी   रोडवरील   विमानतळाच्या जागेत हैदराबाद, मुंबईप्रमाणे आयटी पार्क करण्यास मंजुरी मिळालेली असून, हे या सरकारच्या डोक्यातच शिरत नसल्याचेही शिंदे यांनी सांगितले. सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरावरून मुख्यमंत्री व त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्र्यांमध्ये एकवाक्यता नाही, ही बाब आमच्यासाठी चांगली आहे. यावरून या सरकारमध्ये ताळमेळच नसल्याचे दिसून येत असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. यावेळी शहराध्यक्ष प्रकाश वाले, माजी आ. निर्मलाताई ठोकळ, प्रकाश यलगुलवार आदी उपस्थित होते.