Mon, Aug 19, 2019 09:07होमपेज › Solapur › उजनीतून १५ मार्चपासून आवर्तन

उजनीतून १५ मार्चपासून आवर्तन

Published On: Mar 08 2018 11:00PM | Last Updated: Mar 08 2018 9:37PMबोंडले : वार्ताहर

उजनी धरणामधून उन्हाळी हंगामाकरिता डावा व उजवा कालव्यातून 15 मार्चपासून पाणी सोडण्यात येणार आहे. तर भीमा सीना जोड कालवा पहिले आवर्तन 9 मार्चपासून सोडण्यात येणार आहे. मुंबई येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.  

उजनी धरणामधून उन्हाळी हंगामात सिंचनासाठी प्रस्तावित पाणी नियोजन करण्यासाठी मुंबई येथे कालवा सल्लागार समितीची बैठक सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, आ. बबनदादा शिंदे, आ. प्रणिती शिंदे, आ. हणुमंतराव डोळस, आ. सिद्धराम म्हेत्रे. आ. नारायण पाटील, आ. दत्तात्रय भरणे, जि.प. अध्यक्ष संजयमामा शिंदे, समाधान अवताडे, अधीक्षक अभियंता शिवाजीराव चौगुले आदींच्या उपस्थितीत पार पडली.

या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये उन्हाळी हंगामासाठी कालव्यातून प्रस्तावित दोन आवर्तने सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून कालवा पहिले सिंचन आवर्तन (माण नदी गुंजेगाव बंधार्‍याचे खाली सरकोली बंधार्‍यापर्यंत व सीना नदी अर्जुनसोंड ते कुंडलसंगमपर्यंत) 15 मार्चपासून सोडले जाणार आहे. यासाठी 7.25 टीएमसी पाणी सिंचनासाठी सोडले जाणार आहे. तर दुसर्‍या आवर्तनासाठी कालव्यातून  7.60 टीएमसी पाणी 20 मे नंतर सिंचनासाठी सोडले जाणार आहे.

 भीमा सीना जोड कालवा पहिले आवर्तन (शिराळा, बार्शी व शिरापूर उपसा सिंचन  योजनेसह) 1.40  टीएमसी पाणी 9 मार्च पासून सोडले जाणार आहे. तर दुसरे आवर्तन (आकस्मित आरक्षणापैकी) 1.25 टीएमसी पाणी भीमा नदी व कालव्याच्या दुसर्‍या आवर्तनापूर्वी सोडले जाणार आहे. 

याचबरोबर सीना माढा उपसा सिंचन योजनेमधून पहिले आवर्तनात 0.80 टीएमसी व दुसरे आवर्तनात 0.80 टीएमसी. आष्टी उपसा सिंचन योजनेसाठी पहिले आवर्तनात 0.25 टीएमसी व दुसरे आवर्तन 0.20 टीएमसी पाणी सोडले जाणार आहे.   तर  दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी पहिले आवर्तनात 0.20 टीएमसी व दुसरे आवर्तन 0.15 टीएमसी पाणी सोडले जाणार आहे.

 भीमा नदीवरील सोलापूर महानगरपालिका, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला नगरपालिका व इतर ग्रामीण पाणी पुरवठा योजनेसाठी हिळ्ळी को. प बंधार्‍यापर्यंत (आकस्मित आरक्षणापैकी) सोलापूर महानगरपालिकेच्या मागणीनुसार पहिल्या आवर्तनामध्ये 5.75 टीएमसी पाणी सोलापूर महानगरपालिकेने मागणी केल्यानंतर व  दुसर्‍या आवर्तनामध्ये 5 टीएमसी पाणी सोलापूर महानगरपालिकेने मागणी केल्यानंतर सोडले जाणार आहे.