Sun, May 26, 2019 12:53होमपेज › Solapur › ससा-कासव लढतीत काँग्रेसला ‘अच्छे दिन’

ससा-कासव लढतीत काँग्रेसला ‘अच्छे दिन’

Published On: Feb 11 2018 10:40PM | Last Updated: Feb 11 2018 8:54PMसोलापूर : संतोष आचलारे

पाच वर्षांपूर्वी सत्तेत असताना काँग्रेस पक्षाला ज्या पद्धतीने गटबाजीने पोखरले होते त्याच पध्दतीने भाजपला गटबाजीने पूर्ण पोखरले आहे. ससा व कासवाच्या शर्यतीमुळे आता घोड्याला चांगले दिवस आले असून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे मतदारांचे आकर्षण वाढत असल्याचे दिसून येते. त्यामुळेच सुशीलकुमार शिंदे यांचा राजकीय दबदबा वाढतच असल्याचे दिसून येते. 

आ. प्रणिती शिंदे यांचे राजकीय वलयही अलीकडे वाढले आहे. सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी आ. प्रणिती शिंदे यांना पुढे आणण्याचा सुशीलकुमार शिंदे यांचा मनोदय असल्याचे दिसून येते. मात्र यामुळे काही ज्येष्ठ नेत्यांची नाराजी ओढावून घ्यावी लागणार आहे.त्यामुळे ना. शिंदे यांचीच उमेदवारी हुकमी व खात्रीची ठरल्याची प्रतिक्रिया मतदारांतून उमटत आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर ना. शिंदे यांनी खचित न होता पुन्हा नव्या जोमाने मतदारसंघात भेटीगाठी व कार्यक्रम सुरू केले आहेत. या वयातही त्यांचा उत्साह तरुणांनाही लाजवणारा ठरत आहे.  

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गटा-तटाच्या राजकारणामुळे काँग्रेसला धोका निर्माण झाला होता. परिस्थिती ओळखून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. सिध्दाराम म्हेत्रे, दिलीप माने यांची झालेली राजकीय दिलजमाई ही काँग्रेससाठी अत्यंत सकारात्मक ठरणारी आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही हीच सकरात्मकता निर्माण करण्यास ना. शिंदे यांनी पुढाकार घेतल्यास निश्‍चितच काँग्रेसला ‘अच्छे दिन’ येणार असल्याची परिस्थिती आहे.  ऑनलाईन योजनेच्या नावाखाली कोणतेही काम नीट व पूर्ण झाले नाही. नोटाबंदीच्या अंमलबजावणीत सर्वसामान्यांच्या अपेक्षा फोल ठरल्या आहेत. कर्जमाफीचा फार्स सुरु आहे. 2022 पर्यंत प्रत्येकाला घराचे आश्‍वासन देण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र ज्या कुटुंबात मोबाईल व मोटारसायकल आहे अशा लाभार्थ्यांनाही या योजनेच्या लाभापासून अपात्र ठरविण्यात येत आहे. हमीभावाने शेतमाल खरेदीचा आव आणला जात असून शेतकर्‍यांकडून माल विकल्यानंतर व्यापार्‍यांकडून माल घेण्याचा विचित्र प्रकार सुरु झाल्याचे दिसून येते.