Fri, Apr 26, 2019 01:41होमपेज › Solapur › पाखरांच्या उपद्रव्यामुळे ज्वारी उत्पादकांवर संक्रांत

पाखरांच्या उपद्रव्यामुळे ज्वारी उत्पादकांवर संक्रांत

Published On: Jan 21 2018 2:57AM | Last Updated: Jan 20 2018 8:45PMसोलापूर : संतोष आचलारे

दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावात ज्वारी सध्या हुरड्याच्या अवस्थेत आली आहे. असे असताना पाखरे व कावळ्यांच्या थव्यांनी अख्खे कणीसच फस्त करण्याचे काम सुरू केले आहे. या पक्ष्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी चांगलाच मेटाकुटीला आला आहे. या पक्ष्यांना कितीही हाकलले तरी पुन्हा ते आपले काम फत्तेच करीत असल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. 

यंदा जिल्हाभरात ज्वारी व गहू पेरणीचे  प्रमाण कमी आहे. हरभरा पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. काही शेतकर्‍यांनी हरभर्‍यात घरापुरते ज्वारीची पेरणी केली आहे. जमिनदार शेतकरी व जिरायत शेतकर्‍यांनीही ज्वारीची पेरणी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात पूर्ण केली आहे. 

सध्या ज्वारीला हुरडा आला आहे. कणक तयार होत असल्याने अनेक गावात हुरडा पार्टीची रंगत सुरु झाली आहे. मात्र, यंदा एकतर ज्वारीची पेरणी कमी असताना पक्षी व पाखरांच्या उपद्रव्यामुळे शेतकर्‍यांपुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे. काही शेतकरी दिवसभर ज्वारीच्या फडात उभे राहून गोफ्याने पक्ष्यांना हुसकवण्याचा प्रयत्न करीत आहे. काही शेतकरी बुजगावणे उभे करीत आहेत, तर काही शेतकरी चमकी लावून पक्ष्यांना भिती दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत. इतके सगळे उपाय करुनही पक्षी व पाखर कांही केल्या ज्वारीच्या रानातून जाण्याचे नाव घेत नसल्याने शेतकर्‍यांची सहनशीलता संपली आहे. किती खायचं तेवढ खाऊ दे, उरलेल माझं, अशीच भावना अनेक शेतकर्‍याकंडून व्यक्‍त होत आहे. 

दरवर्षी पाखरांकडून ज्वारीचा दाणा फस्त केला जातो. मात्र यंदा कावळ्यांच्या थव्यांचे प्रमाण जास्त वाढल्याने शेतकर्‍यांचे यंदा पहिल्यांदाच मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकर्‍यांना तर आता केवळ बाटुकावरच समाधान मानण्याची वेळ आल्याने या नुकसानीचे पंचनामा करण्यात यावे, अशीही मागणी होत आहे. ज्वारीची पेरणी कमी व उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट होणार, हे आता स्पष्ट होत असल्याने ज्वारीचे दर आणखी वाढण्याचेही स्पष्ट संकेत मिळत आहेत.