Fri, Apr 26, 2019 17:20होमपेज › Solapur › विडी कचरा संकलनासाठी दंडक

विडी कचरा संकलनासाठी दंडक

Published On: Jan 23 2018 1:11AM | Last Updated: Jan 22 2018 10:05PM सोलापूर ः  वेणुगोपाळ गाडी

घनकचरा व्यवस्थापनाबाबत ‘स्मार्ट सिटी’ला अभिप्रेत अशी शहराची वाटचाल सुरु आहे. विडी कारखानदारांनी विडी कचरा संकलनाचे काम व्यवस्थित होण्यासाठी दंडक घातल्याने कामगारांना शिस्त लागली आहे. परिणामी कचरा संकलन प्रभावीपणे होऊ लागले आहे. 

मनपाने घनकचरा व्यवस्थापनावर मोठा भर दिला आहे. याअंतर्गत शहरात  घंटागाड्यांद्वारे प्रत्येक घरातील कचरा उचलण्यात येत आहे. ही यंत्रणा पुरेशी नसली तरी ती परिपूर्ण होण्याच्यादृष्टीने मनपा प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. शहरात विशेषत: पूर्व भागात विडी उद्योग मोठ्या प्रमाणात आहे. विडी कारखान्यांतून कामगार तेंदूपत्ता (विडीचे पान), तंबाखू हे घरी नेऊन विड्या बनविण्याचे काम करतात. शहरात 15 विडी कारखानदार असून त्यांच्या एकूण 200 शाखांमध्ये सुमारे 70 हजार विडी कामगार आहेत. पूर्वी विडीचा कचरा हा सार्वजनिक ठिकाणी टाकला जात असे. हा कचरा अस्ताव्यस्त पसरला जाऊन अनारोग्याची परिस्थिती निर्माण व्हायची. यावर उपाय म्हणून मनपाने सुमारे 10 वर्षांपूर्वी विडी कारखानदारांसंदर्भात नवा नियम केला. विडी बनविण्यासाठी तेंदूपत्ता कापल्यावर उर्वरित राहणारा कचरा हा कामगारांनी संबंधित विडी कारखान्यात आणून जमा करावयाचा.नंतर हा कचरा कारखानदार आपल्या गोदामात साठविल्यावर मनपाची यंत्रणा हा कचरा घेऊन जाणार, असा नियम बनविण्यात आला होता. या नियमाची काही महिने अंमलबजावणी सुरु होती. नंतर मनपाच्या अनास्थेमुळे बेशिस्ती निर्माण होऊन कचरा पूर्वीप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी टाकण्याचा प्रकार सुरु झाला.  

चार महिन्यांपूर्वी महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी शहरात घनकचरा व्यवस्थापन प्रभावीपणे होण्यासंदर्भात विडी कारखानदारांची बैठक घेऊन पूर्वी ठरलेल्या नियमाची अंमलबजावणी करणार असल्याचे सांगितले. त्यानुसार प्रत्येक विडी कामगार आपापला विडी कचरा हा कारखान्यात जमा करीत आहेत. कारखान्यांतील हा कचरा गोदामात नेला जात आहे. तिथून मनपाच्या यंत्रणेकडून कचरा उचलण्यात येत आहे. या नियमाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी याकरिता प्रत्येक कारखान्यातील नोटीस बोर्डावर कामगारांसाठी सूचना लावण्यात आली आहे. जर या नियमाचे पालन न केल्यास विडीचे माप दिले जाणार नाही, असा दंडक घालण्यात आला आहे. यामुळे कामगारांना शिस्त लागली आहे. विडी कचर्‍याचे व्यवस्थित संकलन सुरु झाल्याने सार्वजनिक ठिकाणी हा कचरा दिसणे नाहीसे झाले आहे.