Sat, Apr 20, 2019 10:45होमपेज › Solapur › टेंभू योजना 1 सप्टेंबरपर्यंत सुरू न केल्यास ठिय्या आंदोलन 

टेंभू योजना 1 सप्टेंबरपर्यंत सुरू न केल्यास ठिय्या आंदोलन 

Published On: Aug 29 2018 1:44AM | Last Updated: Aug 29 2018 12:05AMसांगोला : तालुका प्रतिनिधी 

1 सप्टेंबर पर्यंत थकीत वीज बील भरुन घेवून टेंभू प्रकल्प कार्यान्वित करावा अन्यथा मंगळवार 4 सप्टेंबर पासून शेतकर्‍यांचा प्रचंड मोर्चा काढून पाणी सोडेपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने डॉ भारत पाटणकर यांनी दिला आहे.

टेंभू योजनेच्या थकीत बीलामुळे महावितरणने या योजनांची वीज तोडली आहे. साखर कारखाने, जिल्हा प्रशासन आणि पाटबंधारे विभाग यांनी महावितरणचे थकीत वीजबील त्वरीत भरुन वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी सहकार्य करावे. टेंभू लाभक्षेत्रातील दुष्काळी सांगोला, आटपाडी, तालुक्यांना पाणी मिळण्यासाठी शेतकर्‍यांनी सांगली पाटबंधारे कार्यालयावरती श्रमिक मुक्ती दलाचे प्रमुख डॉ.भारत पाटणकर, आनंदराव पाटील, यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दि. 27 ऑगस्ट रोजी मोर्चा काढून आपल्या मागण्या टेंभू प्रकल्पाच्या सांगली विभागातील अधिकार्‍यांसमोर प्रकर्षाने मांडल्या. 

सांगोला तालुक्यातील बुध्देहाळ तलाव लाभक्षेत्रातील शेतकरी व आटपाडी, खानापूर, कडेगांव, येथील शेतकर्‍यांनी टेंभूच्या पाणी मागणी संदर्भात 18 ऑगस्ट रोजी टेंभू, पाटबंधारे कार्यालयाला मोर्चोचे निवेदन दिले. त्यावेळी सांगली पाटबंधारे कार्यालयाने महामंडळ, साखर कारखाने व जिल्हा प्रशासनाला थकीत वीजबील भरण्या संबंधीचे पत्र दिले. टेंभू लाभक्षेत्रातील वीजबील थकीत असणार्‍या साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांकडून त्यांच्या ऊस बीलातून पाणी पट्टी पोटी पैसे जमा केले आहेत. परंतू ते पैसे पाटबंधारे कार्यालयाकडे भरले नाहीत. त्याचा परिणाम म्हणून वीज कनेक्शन तोडण्यात आले. परिणामी बुध्देहाळ तलाव लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना पैसे भरुनही अद्याप पाणी मिळाले नाही. पाणी न मिळाल्याने तलाव लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांच्या डाळींब बागा, ढोबळी मिरची व इतर पीकांचे करोडो रुपयांचे नुकसान होत आहे. सांगली पाटबंधारे कार्यालयातील उपअभियंता लालासाहेब मोरे, कार्यकारी अभियंता प्रदीप कडुसकर, शाखा अभियंता जयंत गलगले व डॉ.भारत पाटणकर, आनंदराव पाटील व बुध्देहाळ तलाव लाभक्षेत्रातील शेतकरी व आटपाडी तालुक्यातील शेतकरी शिष्टमंडळ यांच्यामध्ये शेतकर्‍यांच्या विविध मागण्या संदर्भात चर्चा होवून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. 

यामध्ये टेंभूचे पाणी टेल टू हेड पध्दतीने प्रथम बुध्देहाळ तलावात सोडण्यात येणार. बुध्देहाळ तलावातील पाणी उपसा करणार्‍या सर्व विद्युत मोटारींचा सर्व्हे करुन तात्काळ मीटर बसविण्याविषयी चर्चा झाली. बुध्देहाळ तलावातील पाण्याचे मोजमाप, तलावातून कॅनॉलमध्ये पाणी पडते त्या ठिकाणी करण्यात यावे. याविषयी सकारात्मक निर्णय झाला.