Tue, May 21, 2019 22:36होमपेज › Solapur › माथाडी कामगारांचा संप; शेतकर्‍यांचा रास्ता रोको

माथाडी कामगारांचा संप; शेतकर्‍यांचा रास्ता रोको

Published On: Jan 03 2018 1:18AM | Last Updated: Jan 02 2018 11:32PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

भीमा-कोरेगाव येथे झालेल्या दगडफेकीच्या घटनेचे पडसाद मंगळवारी सोलापूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीत उमटले. सुमारे 8 हजार माथाडी कामगारांनी बंद पुकारला. यामुळे कांदा लिलाव न झाल्याने संतप्‍त शेतकर्‍यांनी बाजार समितीसमोरचा राष्ट्रीय महामार्ग काही वेळ बंद करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे बाजार समितीत दिवसभर तणावाचे वातावरण होते. 

भीमा-कोरेगाव येथील प्रकरणाच्या निषेधार्थ काम न करण्याचा निर्णय माथाडी कामगारांनी अचानक घेतल्याने बाजार समितीमधील उलाढाल ठप्प झाली. या प्रकारामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान होत असल्याने माथाडी कामगारांना काम करण्याचे आवाहन बाजार समितीचे सचिव विनोद पाटील यांनी केले. मात्र भीमा-कोरेगावप्रकरणी भावना तीव्र असल्याने एक दिवस काम न करण्याचा ठाम निर्णय यावेळी कामगारांनी घेतला. त्यामुळे दुपारचे लिलाव झाले नाहीत. 

अचानक केवळ कांदा लिलावच बंद करण्यात आल्याने यामागे दर पाडण्याचे राजकारण असल्याचा आरोप करीत शेतकर्‍यांनी सकाळी सहा वाजताच बाजार समितीच्या कार्यालयात ठिय्या मारला. परिस्थिती गोंधळाची झाल्याने यावेळी पोलिसांचा फौजफाटा बोलाविण्यात आला. दुपारपर्यंत लिलाव सुरू करू, असे आश्‍वासन बाजार समिती प्रशासनाच्यावतीने सकाळी शेतकर्‍यांना देण्यात आले. मात्र माथाडी कामगारांनी संपाचा ठाम निर्धार केल्याने व वेळ निघून गेल्याने लिलाव सुरू करण्यात यश आले नाही. 
दोन दिवसांपासून बाजार समितीत शेतकरी आपला माल घेऊन बसला आहे. मालाची सुरक्षा करणे व दर मिळेल की नाही याची चिंता असल्याने शेतकर्‍यांनी दुपारी एकच्या सुमारास बाजार समितीच्या गेटसमोर रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी यावेळी काही शेतकर्‍यांना ताब्यात घेतल्याने व लिलाव सुरू करण्याचे आश्‍वासन दिल्याने यावेळी आंदोलन मागे घेण्यात आले. 

दुपारच्या सत्रात माथाडी कामगार संघटनेच्यावतीने आलेल्या गाड्यातील कांदा उतरवून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आलेला 325 ट्रक कांदा उतरविण्याचे काम सुरू करण्यात आले. लिलाव न झाल्याने सुमारे दहा कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती. शेतकरी मात्र आपला कोणीच वाली नसल्याने नशिबाला दोष देत परिस्थितीला सामोरे जात असताना दिसला. 

एक रुपयात जेवणाची व्यवस्था बाजार समितीत मंगळवारी लिलाव न झाल्याने सुमारे एक हजार शेतकरी बाजार समितीत अडकून पडले आहेत. या सर्व शेतकर्‍यांना एक रुपयात जेवण देण्याची व्यवस्था बाजार समितीचे सचिव विनोद पाटील यांनी केली. 

माथाडी संघटनेस नोटीस दिली 

कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक काम बंद केल्याने माथाडी कामगार संघटनेला नोटिसा देण्यात आल्या आहेत. मात्र सामाजिक अस्मितेचा प्रश्‍न असल्याने विषय गुंतागुंतीचा होता. तरीही नाशवंत असणार्‍या भाजीपाला व डाळिंबाचा लिलाव काढण्यात आला. कांदा लिलाव कोणत्याही परिस्थितीत सुरू करण्याची प्रशासनाची तयारी होती. मात्र यात यश न आल्याने आपण दिलगिरी व्यक्‍त करतो, अशी माहिती बाजार समितीचे सचिव पाटील यांनी दिली. बाजार समिती कायद्याचे उल्‍लंघन करणार्‍या व्यापार्‍यांवर कारवाई करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहे. दप्‍तर न देणार्‍या व्यापार्‍यांवर गंभीर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने व्यापार्‍यांचेही प्रशासनाला सहकार्य मिळत नसल्याचे चित्र दिसून आले. 

8 ते 10 कोटींची उलाढाल ठप्प

बाजार समितीत कांदा लिलाव न झाल्याने सुमारे 8 ते 10 कोटींची उलाढाल ठप्प झाली. कांद्याला आता कोठे चांगला दर मिळत असताना तोंडातून घास हिसकावून घेण्याचा प्रकार झाल्याने यावेळी शेतकरी प्रचंड आक्रोश करीत असल्याचे दिसून आले. आपल्या भावना रास्ता रोको करून व्यक्‍त करताता पोलिसांनी शेतकर्‍यांवरच दबाव टाकून ताब्यात घेण्याचे काम केल्याने शेतकर्‍यांत यावेळी प्रचंड संताप निर्माण झाला होता.