Thu, Apr 25, 2019 04:03होमपेज › Solapur › सोलापूरात माकपने पोलिसांचेच पेट्रोल पंप केले बंद (video)

सोलापूरात माकपने पोलिसांचेच पेट्रोल पंप केले बंद (video)

Published On: Sep 10 2018 12:41PM | Last Updated: Sep 10 2018 12:43PMसोलापूर : प्रतिनिधी

पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंद आंदोलनात आज माकपनेही सक्रिय पाठिंबा व्यक्त केला. विशेष म्हणजे ज्या पोलिसांकडून आंदोलनावर नियंत्रण मिळविले जाते त्या पोलिसांच्याच पेट्रोल पंपावर मास्तरांनी मोर्चा काढला व ग्रामीण पोलिसांचा पेट्रोल पंप तासभर बंद केला.

आज सकाळी अकराच्या सुमारास माकपच्या तीन टीम तीन पेट्रोल पंपांवर बंद आंदोलनासाठी रवाना झाल्या. माजी आमदार आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली सिव्हिल हॉस्पिटल चौकाजवळील सोलापूर ग्रामीण पोलिस पंपावर बंद आंदोलन करण्यात आले, तर सिटूचे सचिव सिध्दप्पा कलशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली अशोक चौक पोलिस चौकीजवळील शहर पोलिस पेट्रोल पंप बंद करण्यात आला. नगरसेविका कामिनी आडम आणि माजी नगरसेविका नलिनी कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने झाली. सात रस्ता येथे नगरेसविका कामिनी आडम यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोल पंप बंद करण्यात आला. ग्रामीण पोलिस पेट्रोल पंप येथे माजी आमदार आडम मास्तरांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेले आंदोलन हे शंभर टक्के यशस्वी झाले. सुमारे 25-30 रिक्षाचालकांसह रिक्षात भरून विडी कामगार महिला पेट्रोल पंपावर आणल्या. रस्त्याच्या एका कडेला बंदमध्ये सहभागी झालेल्या रिक्षांच्या रांगा लागल्यामुळे आपोआप एका बाजूचा रस्ता बंद झाला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनीच ग्रामीण पोलिस मुख्यालयापासून  ते सिव्हिल हॉस्पिटल चौकापर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला. शहर पोलिस पेट्रोल पंपावर मात्र तुलनेने माकप कार्यकर्त्यांची संख्या कमी असल्याने पोलिसांनी आंदोलकांना चकवा दिला. पेट्रोल पंप प्रवेशद्वार आंदोलकांनी बंद केला. पंपातून बाहेर पडण्याच्या मार्गावरून पंपात वाहनधारकांना प्रवेशही दिल्याने प्रवेशद्वारावर आंदोलन सुरू आणि आत पेट्रोल पंप सुरू असे दृश्य होते. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पुन्हा सोडून दिले. ग्रामीण पोलिस पंपावर पोलिसांच्या व्हॅनमध्ये सर्व कार्यकर्ते बसू शकले नाहीत. त्यामुळे आडम मास्तरांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेल्यावर राहिलेल्या कार्यकर्त्यांनी स्वतःला अटक करुन घेण्यासाठी पोलिस ठाण्यापर्यंत पुन्हा पायी मोर्चा काढला.