Mon, Mar 25, 2019 09:10होमपेज › Solapur › आता ‘दाढी आणि तलवारकट मिशां’ची क्रेझ

आता ‘दाढी आणि तलवारकट मिशां’ची क्रेझ

Published On: Feb 06 2018 10:57PM | Last Updated: Feb 06 2018 9:15PMवैराग : आनंदकुमार डुरे

मराठा क्रांती मोर्चामुळे मराठ्यांची अस्मिता पुन्हा जागी झाली आहे. मराठ्यांत होणारी ही जागृती त्यांच्या नसानसात भिणू लागल्याने सगळी तरूणाई भगवी बनू लागली आहे. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या कर्तबगारीमुळे प्रत्येक मराठ्यांची छत्रपती ही ताकद बनली. त्यामुळे छत्रपतींसारखी दाढी, मिशी ठेवण्याची जणू एक फॅशन तरुण पिढीत दिसू लागली आहे.
छत्रपती शिवरायांनी कसल्याही प्रकारचा जातीभेद न पाळता अठरा पगड जातींना एकत्र करून सुराज्याची निर्मिती केली. खर्‍या अर्थाने त्यांनी रयतेचे राज्य निर्माण केले आणि त्याच छत्रपती शिवरायांच्या जयंतीचे वेध सध्या तरुण पिढीला लागले आहेत. त्यानिमित्ताने छत्रपतींसारखी दाढी, मिशी ठेवण्याची जणू एक फॅशन तरुण पिढीत वाढू लागली आहे.

तेजस्वी इतिहास
ज्या छत्रपतींमुळे मराठ्यांचा इतिहास ओजस्वी बनला आणि ज्या तळपत्या तलवारींनी हा पराक्रमी इतिहास तेजस्वी केला. अशा शिवछत्रपतींची याद आणि तलवारीची साथ क्षणोक्षणाला स्मरणात रहावी, यासाठी आजचा तरुण मावळा पुढे सरसावला आहे. त्यामुळे सध्या तरुणाईत तलवारकट मिशी आणि छत्रपती दाढीकटची क्रेझ वाढू लागली  आहे...
मराठा क्रांती मोर्चा
ह्याच छत्रपतींसारखे आपण दिसावे म्हणून तरूण धडपडत आहेत. यासाठी केशकर्तनालयात(सलून) गर्दी वाढू लागली आहे. अनेक तरुण पिळदार मिशी राखत असून मिशीला तलवारीसारखी टोकदार व धारेदार बनवत आहेत. छत्रपतींसारखी रुबाबदार मिशी बनवून आपणही राजेंचे कणखर मावळे असल्याचे त्यांना वाटत आहे. छत्रपतींचे नाव घेऊन मिशांवरून बोटे फिरवले तरी इतिहासाचे स्फुरण चढते. नुसत्या मिशाच नाही तर पूर्ण चेहरा छत्रपतींसारखा कसा दिसेल, याकडे बारकाईने तरुणाई लक्ष देत आहे. त्यासाठी दाढीचा आकारही राजेंसारखा बनवला जात आहे. मराठा क्रांती मोर्चापासून अनेक तरूण कपाळावर भगवी चंद्रकोर, कानात छोटं रुद्राक्ष कुंडल, भरदार छत्रपती कट दाढी आणि तलवार कट मिशी असा रुबाबदार चेहरा बनवत असल्याने पुन्हा शिवशाही अवतरल्यासारखं वाटू लागलं आहे.
कोणती फॅशन कधी अवतरेल, हे सांगता येत नाही. फॅशन ही केवळ दिखाऊपणा दर्शवण्यासाठी केली जात होती. मात्र ही तलवारकट मिशी आणि छत्रपती दाढी मान, सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून देत आहे. विशेष म्हणजे ह्या कटसाठी ना मोल आहे ना मूल्य आहे आणि हा कट केवळ मराठा करतात असं नाही, तर ज्याचं ज्याचं प्रेम शिवरायांवर आहे ते सर्व मुस्लिम व इतर जातीधर्माचे मावळे देखील हा कट उत्साहाने मारत आहेत. ही छत्रपती दाढी-मिशीची फॅशन कोणताही जातीभेद न मानता  सर्वच समाजातील तरुण आत्मसात करताना दिसत असून शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपतींच्या विचारांचा वारसासुद्धा तरुण पिढी पुढे चालवेल, असा आशावाद निर्माण झाला आहे.  

जेव्हा जेव्हा दाढीला हात लागतो किंवा आरशात बघतो, त्यावेळी स्वतः बद्दलचा आत्मविश्‍वास तर वाढतोच आणि मनात कोणतेही वाईट विचार येत नाहीत.   

 - आबासाहेब मलमे, वैराग.

छत्रपती शिवरायांनी सर्व जातींच्या मावळ्यांच्या साथीनं स्वराज्य निर्मिती केली. त्यांचे विचार मनात राहावेत, यासाठी हा अट्टाहास आहे. 

    - अजिंक्य माने, अकलूज.

शिवरायांचा दाढीकट पूर्वीपासूनच काहीजण ठेवत  आहेत. मराठा क्रांती मोर्चामुळे तरूणांमध्ये प्रचंड वाढ होऊन या कटची क्रेझ निर्माण झाली.

    - अजय राऊत, नाभिक.

छत्रपती शिवराय कुठल्याही एका जाती पंथाचे नाहीत. त्यांचे शौर्य आदर्शवत आहे. ते कायम स्मरणात राहावे, म्हणून ‘छत्रपती दाढी-कट’ ठेवला आहे. 

         - इम्रान शेख