Tue, Jul 07, 2020 04:45होमपेज › Solapur › कोरोना रुग्ण सापडल्याने वैराग सील, मात्र ग्रामपंचायतीत रंगली दारू पार्टी! (video)

कोरोना रुग्ण सापडल्याने वैराग सील, मात्र ग्रामपंचायतीत रंगली दारू पार्टी! (video)

Last Updated: May 29 2020 1:00PM

मद्यपान करणे आरोग्यास हानिकारक आहे वैराग (सोलापूर) : आनंदकुमार डुरे

गेल्या दोन दिवसांत बार्शी तालुक्यातील वैराग या गावात एक किराणा व्यापारी कोरोनाग्रस्त सापडला असून त्याच्या संपर्कात असणारे अनेक जणांचे रिपोर्ट अद्याप मिळालेले नाहीत. कोरोना रुग्ण सापडल्याने वैराग पूर्ण सील करण्यात आले आहे. मात्र, ग्रामपंचायत कार्यालयात दारूची पार्टी रंगली आणि बघता बघता याचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.  

वैराग ग्रामपंचायत कार्यालयात एक दारुची पार्टी रंगली आणि त्या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने बार्शी तालुक्यात आणि वैराग गावात एकच चर्चा रंगली. त्यामुळे गाव कोमात अन् प्रशासन जोमात, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कोरोनामुळे वैराग पूर्ण सील असताना ग्रामपंचायत कार्यालयात दारू पार्टी रंगते कशी, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढते आहे. सोलापूर जिल्ह्यात आकडे वाढत आहेत. बार्शी तालुक्यात कोरोनाने शिरकाव केला आणि जिल्हा प्रशासनाकडून वैरागला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. एकीकडे जिल्हाप्रशासन आणि तालुका प्रशासन रात्रंदिवस राबत आहे आणि स्थानिक वैराग ग्रामपंचायत प्रशासनातील  वैराग ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी अनिल बारसकर, कार्यालयीन अधीक्षक विलास मस्के, बांधकाम अभियंता  जाधव, लिपिक अफजल शेख हे वैराग ग्रामपंचायत कार्यालयात दारूच्या पार्ट्या करत असल्याचे समोर आले आहे. त्याचे व्हिडिओ आणि फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

सोलापूरचे पोलिस अधीक्षक बार्शी दौऱ्यावर आले असतानाच अधिकाऱ्यांना दारू, गुटखा अशा अवैध धंद्यांवर कारवाई करा, असे सांगितले होते. आता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि पोलिस अधीक्षक मनोज पाटील हे काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागून आहे.