Mon, Aug 19, 2019 04:54होमपेज › Solapur › ‘शोषयुक्‍त खड्डे’ अभियानात बार्शी तालुका अग्रस्थानी

‘शोषयुक्‍त खड्डे’ अभियानात बार्शी तालुका अग्रस्थानी

Published On: May 31 2018 10:59PM | Last Updated: May 31 2018 10:13PMबार्शी ः गणेश गोडसे

‘शोषयुक्त खड्डे आणि डासमुक्त गाव’ या अभियानाची बार्शी तालुक्यात झालेली दमदार सुरुवात वेगानेच सुरू आहे. प्रारंभीच घेतलेली गती कायम  असल्यामुळे बार्शी तालुका सध्याही संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात अग्रस्थानी ठरत आहे. 

सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली शोषयुक्त खड्डे आणि डासमुक्त गाव हे अभियान संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. आजपर्यंत बार्शी तालुक्यात या अभियानांतर्गत 2568 शोषखड्डे घेण्यात आले असून शोषखड्ड्यांचे काम प्रगतीपथावर आहे. सोलापूर जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या अगोदर बार्शी तालुक्यात या अभियानाला युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे. 

बार्शी तालुक्याच्या ग्रामीण भागातील  सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्याबरोबरच डासमुक्त गाव अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी बार्शी तालुक्यातील 130 ग्रामपंचायती अंतर्गत 9101  हजार शोषखड्डे निर्माण करण्याचे काम जून 2018 अखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 

बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य सुधारण्याबरोबरच शोषखड्ड्यांमुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यासाठी शोषखड्डे लाभदायक ठरणार आहेत. बार्शी तालुका प्रशासनाने या अभियानांतर्गत आराखडा तयार केलेला असून त्याची अंमलबजावणी सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे.

 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, चौदावा वित्त आयोग तसेच लोकसहभाग आदी वेगवेगळ्या  माध्यमातून हे अभियान राबविण्यात येणार आहे. घरातील सांडपाणी उघड्यावर सोडणार्‍या ग्रामीण कुटुंबांना या अभियानांतर्गत प्राधान्य दिले जाणार आहे. बार्शी तालुक्यातील 130 ग्रामपंचायतीमधून नऊ हजार शोषखड्डे घेण्याचे नियोजित आहे. सदर अभियानाची जबाबदारी व सनियंत्रणासाठी 65 पालक अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली असून आजपर्यंत बार्शी तालुक्यात 2568 शोषखड्ड्यांची कामे पूर्णत्वास गेली असून 1440 शोषखड्ड्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. कोरफळे, देवगाव, मांडेगाव, उपळाई (ठों.), जामगाव (पा.), शेळगाव (व्हळे) या गावाच्या ग्रामपंचायतींनी या अभियानात आघाडी घेतलेली आहे. या अभियानांतर्गत शेळगाव (व्हले), हिंगणी (पा.), आळजापूर, तांदुळवाडी, मानेगाव (धा.), देवगाव ही गावे शंभर टक्के शोषखड्डे घेऊन आदर्श गावे निर्माण केली जाणार आहेत. आगामी दोन महिन्यात तालुकास्तरावर तसेच ग्रामस्तरावर या अभियानाचा पाठपुरावा व नियमित आढावा घेऊन अभियानाला गती दिली जाणार आहे.